चित्रपटसृष्टीमध्ये बड्या कलाकारांची मुले जेव्हा पदार्पण करताता तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. याला मराठी चित्रपटसृष्टी देखील अपवाद नाही. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील त्यातील एक आहे. ती अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तसेच कमी कालावधीतच तिने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्रियाने काम केलेल्या ‘मिर्झापूर’ आणि ‘हाऊस अरेस्ट’ या वेब सीरिज विशेष गाजल्या. त्यातून तिला लोकप्रियता देखील मिळाली. पण आता श्रियाच्या अभिनयाने थेट दाक्षिणात्य कलाकाराला भुरळ पडली आहे. या कलाकाराने सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रियाचे कौतुक केले आहे.

मराठमोळ्या श्रियाच्या अभिनयाने प्रभावित झालेला अभिनेता म्हणजे बाहुबली फेम ‘भल्लालदेव’ उर्फ राणा डग्गुबती. हिंदी आणि मराठीमध्ये काम करणारी श्रिया आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

राणाने श्रियाचा आगामी चित्रपट ‘हाती मेरे साथी’मधील पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करताना श्रिया एक अप्रतिम सहकलाकार आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये तिचे स्वागत असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

‘हाती मेरे साथी’ या चित्रपटात राणा डग्गुबती, पुलकीत सम्राट, झोया हुसैन यांच्यासोबत श्रिया झळकणार आहे. पण ती नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट येत्या १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जंगलावर होणारे अतिक्रमण आणि त्याचा प्राण्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याभोवती चित्रपटाची कथा फिरणार असल्याचे म्हटले जात आहे.