शनिवारी, २० जानेवारी रोजी, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अष्टपैलू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अशा प्रकारे त्याने आपला नवीन जीवन साथीदार निवडल्याचे स्पष्ट केले. शोएबच्या या निर्णयामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. पाकिस्तानी मीडियानुसार, शोएबच्या कुटुंबातील एकही सदस्य या लग्नाला उपस्थित नव्हता. याशिवाय सानिया मिर्झाने शोएब मलिकपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला हेही यानिमित्ताने समोर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी व बिग बी यांच्यात नेमकं काय संभाषण झालं? जाणून घ्या

पाकिस्तानी मीडियानुसार, शोएब मलिकच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानिया मिर्झा नाराज होती. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र, अद्याप दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही. आतापर्यंत दोघे घटस्फोटाच्या बातम्यांचे खंडन करत होते, मात्र शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावरून आता त्यांचे नाते तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच आता सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये सानिया आणि शोएब हे एक जोडपं म्हणून एका पुरस्कार सोहळ्याला आलं होतं. त्यावेळी बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने या दोघांना मंचावर बोलावून त्यांच्याशी धमाल गप्पा मारल्या. त्यावेळचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खानने या दोघांना एकमेकांमधल्या कोणत्या गोष्टी आवडल्या याबद्दल विचारणा केली तेव्हा या दोघांनी त्यावर उत्तर दिलं होतं.

शाहरुखच्या प्रश्नावर उत्तर देताना सानिया म्हणाली, “तशा तर मला बऱ्याच गोष्टी आवडल्या, पण तो खरंच खूप शांत आणि लाजाळू आहे. तुम्हालाच त्याला बऱ्याच गोष्टी शिकवायला लागतील जसं की मुलींशी बोलणं रोमान्स करणं.” तर या प्रश्नाचं उत्तर शोएब मलिक म्हणाला, “सानियामध्ये मला नेमकं काय आवडलं हे समजायला वेळच मिळाला नाही अन् तेवढ्यात लग्नच झालं.” हे उत्तर ऐकून सानियाच्या चेहेऱ्यावर हसू आलं.

शोएबचे दुसरे लग्न सानियाशी झाले होते. याआधी त्याने आयशा सिद्दीकीबरोबर लग्न केले होते. त्याचवेळी, सना जावेदसह शोएबचे हे तिसरे लग्न आहे. सना ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनाचाही घटस्फोट झाला असून तिचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी सनाने २०२० मध्ये पाकिस्तानी गायक उमेर जसवालसोबत लग्न केले होते. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza answers question of shahrukh khan what she likes about shoaib malik avn
First published on: 23-01-2024 at 13:52 IST