मिलन लुथरिया यांच्या ‘द डर्टी पिक्चर’नंतर सेलिब्रिटींच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट प्रदर्शित झाला नाही. सिल्क स्मिताच्या या बायोपिकनंतर आता संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून आज (मंगळवार) त्याचा टीझर प्रदर्शित होणार आहे. आईला गमावल्यापासून ते कारागृहाच्या शिक्षेपर्यंत संजूबाबाच्या आयुष्यातील चढउतार या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे.

यामध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार असून सोनम कपूर, दिया मिर्झा आणि मनिषा कोइराला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रणबीरला आजवर रोमॅण्टिक भूमिकांमध्ये जास्त पाहिलं गेलं. हा त्याचा पहिलाच बायोपिक असून संजूबाबाला साकारण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. तासनतास त्याचे फुटेज पाहण्यापासून ते त्याच्यासोबत वेळ घालवण्यापर्यंत रणबीरने कसून प्रयत्न केले आहेत.

या चित्रपटात सोनम ही माधुरी दीक्षितची भूमिका साकारणार असून निर्मात्यांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. याशिवाय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्नासुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अनुष्का शर्मा पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘मसान’ फेम विकी कौशलसुद्धा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. संजूबाबाच्या आईची म्हणजेच नर्गिस यांच्या भूमिकेत मनिषा कोइराला पाहायला मिळणार आहे. तर दिया मिर्झा संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारणार आहे. संजयच्या वडिलांच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी परेश रावल यांची निवड केली असून टीझरची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या बायोपिकचं नाव ‘संजू’ असं असून २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.