सुप्रीम कोर्टात ‘पद्मावत’ चित्रपटाच्या अनुषंगाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने खटला लढणाऱ्या वकील हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी साळवे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती वृत्त संस्थांनी दिली. या चित्रपटावर कोणत्याही राज्य सरकारकडे बंदी आणण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा साळवे यांनी उचलून धरला होता.

‘पद्मावत’ चित्रपटाच्या बाजूने वक्तव्य केल्यामुळे साळवेंना त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने प्रसिद्ध केले. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु असून, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. साळवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर अनेकांचेच लक्ष करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कल्वी यांच्याकडे गेले. पण, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जबाबदार ठरवू नये असे म्हणत कल्वी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘बंदीच्या कचाट्यातून ‘पद्मावत’ सुटला, मला आनंद झाला’

दरम्यान, देशातील चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ चित्रपटावर असलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी आपला निर्णय दिला. ‘पद्मावत’ चित्रपट देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा निर्णय देत सुप्रीम कोर्टाने चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने चित्रपटाच्या टीमला दिलासा मिळाला असला तरीही चित्रपटाला होत असलेला विरोध कायम आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे म्हणत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याची आहे असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.