जानेवारी महिन्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यात शबाना आझमी जखमी झाल्या होत्या. बरेच दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या अपघाताच्या कटू आठवणी शबाना आझमींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्या. “त्या अपघातात मी थोडक्यात बचावले”, असं त्या म्हणाल्या.

खालापूर टोलनाक्याहून दोन किलोमीटरच्या अंतरावर शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ताबडतोब शबाना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, “मी बेशुद्ध झाले होते. मी थोडक्यात बचावले होते. माझ्या मेंदूला दुखापत झाली होती. ४० दिवसांनंतर मी पुन्हा काम करू लागले होते. कारण कामामुळे त्या अपघाताच्या कटू आठवणींचा फार परिणाम झाला नाही. त्यावेळी मला जगभरातून अनेक लोकांचे फोन व मेसेज येत होते. लोकांच्या प्रार्थनांमुळे मी लवकर बरी झाले.”

अपघातावेळी शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर त्यांच्या पुढील दुसऱ्या कारमध्ये होते. “अपघातानंतर माझ्या डोक्यात पहिला भीतीदायक विचार हाच आला की ती जिवंत आहे का? कारण अपघात इतका भीषण होता की त्यात पूर्ण कारचा चेंदामेंदा झाला होता. आम्ही शबानाला गाडीतून बाहेर काढलं तेव्हा ती बेशुद्ध आणि रक्तबंबाळ होती”, असं जावेद अख्तर एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अभिनेते अनिल कपूर, तब्बू आणि अनेक कलाकारांनी शबाना आझमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. नंतर जावेद अख्तर यांनीही सोशल मीडियावर शबाना यांनी प्रकृती स्थिर असल्याचे कळवले होते.