बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर याने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा पिता बनल्याचे जाहीर केल्यानंतर सध्या त्याच्यावर अनेकजणांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, सध्याच्या घडीला करणला एकटे सोडा, त्याला त्याचे खासगी आयुष्य जगू द्या, असा सल्ला त्याचा जवळचा मित्र शाहरूख खान याने दिला आहे. काल मुंबईत पार पडलेल्या एका फॅशन शोदरम्यान शाहरूखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शाहरूख खानला करणला सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या अपत्यप्राप्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सुरूवातीला शाहरूख खान या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळत होता. मात्र, काही आढेवेढे घेतल्यानंतर शाहरूख करण जोहरच्या आयुष्यातील या क्षणाविषयी बोलता झाला. यावेळी शाहरूखने करण जोहरला शुभेच्छा दिल्या. मात्र, हा त्याचा आयुष्यातील अत्यंत खासगी क्षण असून आपण त्याचा आदर करायला हवा, असे शाहरूखने सांगितले.

आपण त्याला शुभेच्छा देऊयात. मात्र, तरी हा अत्यंत खासगी क्षण आहे. त्यामुळे याबद्दल प्रतिक्रिया न देणे म्हणजे बंदिस्तपणा आहे, असे मला वाटत नाही. माझ्या आयुष्यात हा क्षण आला होता. त्यामुळे हे क्षण किती खासगी असतात याची मला जाणीव आहे. आपण याचा आदर करू आणि त्यामध्ये व्यत्यय आणता कामा नये. येत्या काही दिवसांतच आपल्याला या सगळ्याचा आनंद साजरा करायला मिळेल, असे शाहरूखने म्हटले.

करण जोहरने रविवारी सरोगसीच्या माध्यमातून पुत्र आणि कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याचे सांगत सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला होता. यश आणि रूही अशी या जुळ्या मुलांची नावे आहेत. मुंबईच्या अंधेरी येथील मसरानी रुग्णालयात करण जोहरच्या दोन मुलांचा जन्म झाला आहे. करणने शुक्रवारी त्यांच्या जन्माची नोंदणी केली. या नोंदणीमध्ये वडिल म्हणून करण जोहरचे नाव आहे. मात्र यामध्ये आईच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. करण जोहरचा जवळचा मित्र आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा तिसरा मुलगा असलेल्या अबरामचा जन्मदेखील मसरानी रुग्णालयात झाला होता. जून २०१३ मध्ये शाहरुखला तिसऱ्या अपत्याची प्राप्ती झाली होती. यानंतर जून २०१६ मध्ये अविवाहित असलेल्या तुषार कपूरला सरोगसीच्या माध्यमातून पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती.