बॉलिवूडप्रमाणेच चाहत्यांच्या मनावर अभिनयाची भुरळ घालणारा अभिनेता शाहरुख खानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तो किंग खान, बादशहा, बाजीगर, राज या सारख्या अनेक नावाने ओळखला जातो. शाहरुखचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले असून ‘बाजीगर’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाने नुकतीचं २५ वर्ष पूर्ण केली असून शाहरुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या चित्रपटाविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शाहरुख ‘रोमान्सचा बादशहा’ या नावाने ओळखला जातो. मात्र बाजीगर या चित्रपटामध्ये त्याने वठविलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याच्या करिअरला नवी कलाटणी मिळाली. अब्बास-मस्तान दिग्दर्शित या चित्रपटाने नुकतीचं त्याची २५ वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने शाहरुखने व्हिडिओ शेअर “कभी-कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है..और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं” हा संवाद पुन्हा म्हटला आहे.

‘बाजीगरला २५ वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटाने मला सारं काही दिलं. माझ्या अभिनयाच्या कक्षा रुंदावण्यास या चित्रपटाने मला मदत केली. इतकंच नाही तर याच चित्रपटामुळे मला आयुष्यभर साथ देतील असे मित्रही दिले’, असं शाहरुखने या व्हिडिओत म्हटलं आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी झळकल्या आहेत. त्यामुळे या दोघींचेदेखील शाहरुखने आभार मानल्याचं पाहायला मिळालं.