शाहरुख खान सोबत एक फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी त्याचे जगभरातले कोट्यवधी चाहते धडपडत असतात. शाहरूखसोबत एखादा फोटो काढायला मिळाला तरी त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याच्यासोबत काढलेले फोटो ‘Fan moment’ म्हणून शेअर करताना चाहत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान काही औरचं असतं. पण आज मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कारण यावेळी शाहरुखनं आपला ‘Fan moment’ ट्विटरवर शेअर केला आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन भारतात आले आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये ख्रिस्तोफर यांच्या डंकर्क सिनेमाला ऑस्करसाठी नामांकनं मिळाली होती. ख्रिस्तोफर यांनी हॉलिवूडमधल्या ‘इन्सेप्शन’, ‘फॉलोइंग’, ‘द डार्क नाइट’, ‘द प्रेस्टिज’, ‘इंटरस्टेलर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अर्थात हे चित्रपट हॉलिवूडमधले सर्वात गाजलेले चित्रपट ठरले. जगभरात ख्रिस्तोफर नोलन यांच्या सिनेमांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाचा शाहरुखही ‘जबरा फॅन’ आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह शाहरुखलाही अनावर झाला आहे. हा आपला ‘Fan moment’ आहे असं ट्विट करत शाहरुखनं ख्रिस्तोफर यांच्यासोबत आपला फोटो शेअर केला.

याआधी अभिनेता आणि राजकीय नेते कमल हसन यांनीही ख्रिस्तोफर यांच्यासोबत फोटो शेअर केला. ज्या सिनेमासाठी ख्रिस्तोफर यांना ऑस्करचं नामांकन मिळालं तो मी चित्रपटगृहात जाऊन न पाहता इंटरनेटवर पाहिला यासाठी मी त्यांची माफी मागतो, आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या दिग्दर्शकानं माझा एक सिनेमा फार पूर्वीच पाहिला आहे हे ऐकून मला आनंद झाला असंही कमल हसन यांनी ट्विट करत म्हटलं आहे. ख्रिस्तोफर हे पहिल्यांदाच भारतात आले आहेत.