शीर्षक वाचून काहीसे गोंधळलात का? ‘गाईड’चे ‘आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है…’ असे म्हणेपर्यंत ‘गाईड’ची रोझी अर्थात वहिदा रेहमान डोळ्यासमोर आली असताना हे एकदम स्मिता पाटीलचे नाव कसे, असा तुम्हाला प्रश्न पडला असणार. नव्हे नव्हे पडायलाच हवा. काहीनी मात्र हा बहुधा ‘भोली सुरत दिल के खोटे’ अथवा ‘शोला जो भडके दिल मेरा धडके’ या गाण्यांसारखा हा प्रकार असेल असा विचार केला असेलही. मूळ ‘अलबेला’ या हिंदी चित्रपटातील दोन गाणी ‘एक अलबेला’ या येऊ घातलेल्या चित्रपटात वापरण्यात आली आहेत… असेच काहीसे ‘आज फिर…’ गाण्याचे असावे असे म्हणत असाल तर ते फारसे चुकीचे नाही. १९८३ साली दिग्दर्शक राज एन. सिप्पीचा ‘कयामत’ नावाचा चित्रपट आला होता. धर्मेंन्द्र, शत्रुघ्न सिन्हा, जयाप्रदा, पूनम धिल्लो आणि स्मिता पाटील यांच्या त्यात भूमिका होत्या. चित्रपटात स्मिताच्या वाढदिवसाच्या प्रसंगी तिला गाणे गायची विनंती होते. राज सिप्पीने एखादे नवे गाणे तेथे वापरण्यापेक्षा विचार केला की एखादे जुने गाणे वापरले तर? त्यासाठी निर्मिती संस्थेची परवानगी हवी. ‘नवकेतन फिल्म’ने खास करून विजय आनंदने या कल्पनेला होकार दिला व स्मिता पाटीललाही ‘आज फिर जीने की…’ साकारायची संधी मिळाली. चित्रपटात हे गाणे स्मिता पाटीलबरोबरच जयाप्रदावरदेखील चत्रीत करण्यात आले आहे. त्यानंतर अशा पध्दतीने पडद्यावरचा अन्य कलाकार आणखी एखाद्या चित्रपटातील गाणे साकारतो ही पध्दत विविध अंगाने रूळली. चित्रफितींच्या युगात त्याला वेग आला. नव्वदच्या दशकात एका चित्रफित कंपनीने आपण जणू भन्नाट कल्पना आणली अशा थाटात ‘तिसरी मंझिल’, ‘पाकिजा’ अशा जुन्या चित्रपटातील गाण्यांवर माधुरी दीक्षित वगैरे कलाकारांवर गाणी चित्रीत केली. अशा प्रकारची १० ते १२ गाणी असलेल्या चित्रफितीला रसिकांचे प्रेम मात्र लाभले नाही.
तर दुसरा प्रकार रिमिक्स गीतांचा आला व काही काळ चक्क फोफावलाही. जुन्या नृत्य गीतांवर आधुनिक संगीतचा साज चढवण्याच्या या प्रकारात गोंगाटच फार होता. नि चित्रीकरणात बराचसा ओंगळवाणेपणा. ‘काटा लगा’ हे त्यातले खूप वादग्रस्त उदाहरण होय. अशा रिमिक्स नृत्य मनोरंजनाचा चक्क मोठा रसिक वर्ग होता. हे टाईमपास मनोरंजन प्रतिष्ठा मिळवणे शक्यच नव्हते. तर चित्रपटातून जुनी गाणी नवा रंग घेऊन येऊ लागली. यामध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट वेगळा ठरतो. चित्रपटात ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील मूळ पदे वापरली असून, तसे करणे गरजेचे होते. त्यामुळे मूळ क्लासिकल गीते मासिकल झाली हे फार महत्वाचे. तर ‘त्रिदेव’चे ‘गजर ने किया है इशारा’ ‘अझर’ चित्रपटात पुन्हा आले तरी त्याची पातळी गल्ली मनोरंजनातील रेकॉर्ड डान्स पुरतीच राहिली. खरं तर लोकप्रिय गाणी अन्य कोणीतरी साकारणे याची मूळे गल्लीतील व वाद्यवृंदातील रेकाँर्ड डान्स यातच आहेत. पण त्याला प्रतिष्ठा मात्र अशी जुनी गाणी पुढील काळातील चित्रपटात वापरली जाऊ लागल्यावर आली… काही गोष्टींचे स्वरूप बदलत जाते ते हे असे.

व्हिडिओ


सौजन्य – सुशिल यादव