|| गायत्री हसबनीस

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या उत्कृष्ट आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सोनी लिव्ह’वरील ‘द व्हिसलब्लोअर’ या वेबमालिकेतून ओटीटीवर पदार्पण केले आहे. नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, लघुपट या सर्वच माध्यमांतून वेगळी छाप उमटवणाऱ्या सोनालीच्या मते ज्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळालेले नाही, अशांसह सगळ्यांनाच ओटीटीने योग्य संधी मिळवून दिली आहे.

‘द व्हिसलब्लोअर’च्या निमित्ताने ओटीटीच्या अनुभवाबद्दल बोलताना, वेबमालिकेतील लहानातली लहान भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहाते. या माध्यमाने सौंदर्य, वय आणि आकार या तिन्हींच्या व्याख्या बदलून टाकल्या आहेत, असं मत तिने व्यक्त केलं.

खरंतर सोनालीने याआधी ‘मुंबई डायरीज’ या वेबमालिकेतून काम केलं होतं. त्यातली माझी व्यक्तिरेखा लहान असली तरी प्रभावी होती. ‘द व्हिसलब्लोअर’मधून मी पूर्णवेळ व्यक्तिरेखा साकारली असल्याने हे माझं ओटीटीतलं पदार्पण आहे असं म्हणायला हरकत नसल्याचं सोनाली सांगते. ‘मी या वेबमालिकेत झैनाब पारकर नावाची भूमिका करते आहे. जी एका नामवंत वृत्तवाहिनीची संपादक आहे. मी इतकी वर्षे या क्षेत्रात असल्याने मला वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना अधिक जवळून पाहता आले आहे. ‘लोकसत्ता’शीही मी सलग काही वर्षं संलग्न असल्याने तेथील वरिष्ठांची कामाची पद्धत मी प्रत्यक्ष अनुभवली होती. पत्रकारांच्या कामाचे स्वरूप, दडपण, बातमी देताना होणारी धावपळ आणि या कामाचे महत्त्व हे सगळं माहितीचं असल्याने मला या भूमिकेचं आकर्षण  वाटलं,’ असं तिने सांगितलं. आम्हा कलाकारांना पाठ थोपटण्यासाठी अनेक कौतुकाचे हात पुढे येत राहतात, परंतु चोवीस तास निर्भीडपणे समाजासमोर अनेक आव्हानांना सामोरं जाऊन बातमी देणाऱ्यांना शाब्बासकीची थाप देणारे हात फार कमी लाभतात. तरीही ते त्यांच्यापरीने कायम लढत असतात. न घाबरता लढत राहणं ही पत्रकारांमध्ये दिसून येणारी वृत्ती झैनाबच्या व्यक्तिरेखेतही आहे. त्यामुळे झैनाब साकारणं मला आव्हानात्मक वाटलं, असंही ती म्हणाली.

या वेबमालिकेच्या कथेतून मिळणारा संदेश आणि झैनाबच्या व्यक्तिरेखेला असलेले अनेक कंगोरे यामुळे आपण भूमिकेला होकार दिल्याचेही तिने सांगितले. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला दाबते आहे, असं अनेकदा आपल्याला वाटत असतं. मात्र या परिस्थितीचा विचार न करता आपला आतला आवाज आपल्याला काय सांगतो, यावर झैनाब भर देते. प्रसंगी ती लढायलाही तयार होते. तिच्यासारखी मंडळी आपल्या आसपास असतील तर नक्कीच आपलं आयुष्य स्फूर्तिदायक होईल. कोणावर कुरघोडी न करता परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो यावर भर देत आपण प्रत्यक्ष कृती करायला लागू. झैनाबच्या व्यक्तिरेखेतून ही बाब प्रभावीपणे लक्षात येईल, असा विश्वास सोनालीला वाटतो.  

झैनाबसारखी आपली आईही निर्भीड होती आणि तोच स्वभाव आपल्यातही उतरला आहे, हे नमूद करताना सोनालीने आपल्या आईची आठवण सांगितली. ‘‘माझी आई मला निर्भीड वाटते. ती फार मोठी समाज कार्यकर्ती नाही किंवा पुरस्कारप्राप्त शिक्षिकाही नाही. ती एक सर्वसामान्य गृहिणी आहे, पण तिने आत्तापर्यंत कुठलाही अन्याय सहन केलेला नाही. नात्यांमधला असो, जीवनावश्यक गोष्टी किंवा व्यवहारातला असो वा प्रत्यक्ष समाजात कोणी एखाद्याने मुलीची छेड काढली किंवा तत्सम अन्यायकारक प्रसंग तिने पाहिला तर इतरांप्रमाणे ‘‘काय बाई, हल्ली सगळं असंच झालंय!’’ अशा प्रकारची विधानं ती करत बसत नाही. न्यायाची कास धरत प्रत्येक वेळेला त्या अन्यायग्रस्त व्यक्तीला धीर द्यायचा पुरेपूर प्रयत्न आईने केला आहे,’’ असे तिने सांगितले. अर्थात सगळीच परिस्थिती वाईट आहे असंही मानण्याचं कारण नाही. अजूनही लोकांमध्ये माणुसकी आहे, याचा तिला आलेला अनुभवही तिने सांगितला. मध्यंतरी एका मुलीच्या मदतीकरता मी १०० नंबरवरून फोन केला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याच नंबरवरून मला परत फोन आला आणि माझी विचारणा करण्यात आली की तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा सगळंच वाईट आहे असं ठामपणे न वाटून घेता माणुसकीची कदरही खूप जणांमध्ये आहे, असं ती म्हणते.

‘द व्हिसलब्लोअर’च्या निमित्ताने सोनालीच्या भूमिकेचे आणि संपूर्ण वेबमालिकेचे कौतुक होते आहे. ओटीटीवर मिळणारे हे यश, वलय सोनालीला कौतुकास्पद वाटते. ओटीटीवर सध्या लेखक आणि दिग्दर्शक यांच्या आगळ्या  सर्जनशीलतेतून नवीन होतकरू कलाकार आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत हे तिला महत्त्वाचं वाटतं. ओटीटीविषयी कौतुकाने बोलताना न थकणारी सोनाली लवकरच चित्रपटातूनही पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून समोर येईल, अशी आस प्रेक्षकांनाही लागून राहिली आहे.

टाळेबंदीच्या काळात ज्याप्रकारे आपण पत्रकार, वैद्यकीय कर्मचारी यांना कोविड योद्धे म्हणून मानवंदना दिली, त्याप्रकारे ओटीटी माध्यमालाही आपण मनोरंजन योद्धा म्हणून मानवंदना द्यायला हवी. या माध्यमाने इतक्या कठीण काळात सर्वांचे मनोरंजन केले. ज्येष्ठ नागरिक किंवा जे आजारी आहेत त्यांना हतबल झाल्यासारखं वाटत होतं, पण ओटीटीने तो विरंगुळा त्यांना दिला. प्रेक्षकांना दिलासा देण्याबरोबरच हे नवमाध्यम सर्व कलाकारांना आपलंसं करणारं असल्याने ओटीटी मला प्रचंड आशावादी वाटतं.

सोनाली कुलकर्णी