लॉकडाउनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अनेक स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी परतण्यास मदत केली. लाखो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवल्यामुळे सोनू सूदने देशातील लोकांची मने तर जिंकली, त्याचबरोबर आज तो त्यांच्यासाठी खरा सुपरस्टार ठरला आहे. हा सुपरस्टार करोनामुळे आर्थिक संकटात अडकेलेल्या लोकांना जमेल त्या पद्धतीने मदत करत आहे. त्याने शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर भेट म्हणून दिला आहे, तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे नोकरी गेलेल्या मुलीला नोकरी मिळवून दिली. आज या सुपरस्टारचा वाढदिवस आहे. स्वतःचा वाढदिवस असला, तरी त्यानेच स्थलांतरीत मजुरांना आणखी मोठं गिफ्ट दिलं आहे.

नुकताच सोनू सूदने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने प्रवासी मजदूरांसाठी नोकरी उपलब्ध करुन दिल्या आहे. ‘माझ्या वाढदिवसा निमित्त मी माझ्या प्रवासी भावंडांसाठी PravasiRojgar.com येथे ३ लाख नोकऱ्यांसाठी करार केला आहे. येथे काम करणाऱ्यांना चांगला पगार, PF, ESI आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea आणि इतर लोकांचे मनापासून आभार’ असे त्याने म्हटले आहे.

Video: कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदचे अश्रू अनावर, पाहा नेमकं काय झालं

अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिके दिसणारा सोनू सूद खऱ्या खुऱ्या आयुष्यात अनेकांसाठी सुपरहिरो म्हणून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एका मुलीला नोकरी गमवावी लागली होती. ती मुलगी घर खर्चासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती. सोनू सूदला तिच्या बद्दल माहिती मिळताच त्याने तिला नोकरी मिळवून दिली.

त्यापूर्वी त्याने आंध्रप्रदेशमध्ये मुलींच्या सहाय्याने शेतात काम करणाऱ्या गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर भेट म्हणून दिला होता. तसेच जॉर्जियामध्ये अडकलेल्या काही भारतीय विद्यार्थांना मायदेशी आणण्यासाठी सोनू सूद प्रयत्न करत आहे.