बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी मतदान होणार असून १०६६ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. दरम्यान अभिनेता सोनू सूदने “योग्य आणि प्रामाणिक उमेदवारालाच मतदान करा अशी विनंती बिहारच्या नागरिकांना केली आहे. शिवाय “वोटिंग मशिनचं बटण दाबण्यासाठी बोटाचा नव्हे मेंदूचा वापर करा.” असं म्हणत त्याने मतदानाचं महत्व देखील समजावून सांगितलं आहे.

अवश्य पाहा – “४ हजार कोटी द्या चित्रपट ऑनलाईन रिलीज करतो”; निर्मात्याची खुली ऑफर

“ज्या दिवशी बिहारमधील नागरिकांना कामासाठी इतर राज्यांत जावं लागणार नाही. उलट काम मिळवण्यासाठी इतर राज्यांतील लोक बिहारमध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. त्यामुळे वोटिंग मशिनचं बटण दाबण्यासाठी बोटाचा नव्हे मेंदूचा वापर करा.” अशा आशयाचं ट्विट सोनू सूदने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते?; महेश टिळेकरांचा जान कुमारला संतप्त सवाल

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.