गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘ढिशूम’ या चित्रपटाचे टीम इंडियासाठी स्पेशल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौ-यावर आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे होणा-या चौथ्या सामन्याच्या काळात या चित्रपटाचे भारतीय क्रिकेटर्ससाठी खास स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक खेळांडूनी पसंती दर्शवली आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा चित्रपट तिथे दाखवण्यात येणार आहे. रोहित शेट्टी याने दिग्दर्शित केलेला आणि जॉन अब्राहम, वरूण धवन यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. एका नावजलेल्या क्रिकेटरचे महत्त्वाच्या सामन्याआधी अपहरण होते आणि त्याला शोधायला हे नायक निघतात अशी साधारण या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात क्रिकेट हा विषय अतिशय उत्तमरित्या हाताळला गेला आहे त्यामुळे टीम इंडियाला तो पाहण्याची उत्सुकता आहे. म्हणूनच केवळ टीम इंडियासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सांगितले. तर या चित्रपटात माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी देखील भूमिका साकारली असल्यामुळे क्रिकेटर्समध्येही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे असेही जॉन अब्राहम यांनी सांगितले. ‘ढिशूम’ हा चित्रपट क्रिकेटर्स पाहणार म्हणून जॉन आणि वरूण दोघेही खूपच खूष आणि उत्सुक देखील आहेत.