५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमुळे सर्वसामान्यांचे कितीही हाल होत असले तर त्यांच्या करमणुकीचे हाल होऊ नये याची काळजी मराठी रंगभूमी घेताना दिसत आहे. या आठवड्यात ‘सुयोग’ सोबत ‘झेलू एंटरटेनमेंट’ ची नवी कलाकृती ‘तीन पायांची शर्यत’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. आता या नाटकाच्या पाठोपाठ सुमीत राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांचेही ‘एक शून्य तीन’ हे नाटक रंगभूमीवर यायला सज्ज झालं आहे.

नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक दिग्दर्शित हे नाटक रहस्यमय आणि थरारक या धाटणीत मोडणारे आहे. या नाटकात सुमित राघवन एका पत्रकाराची भूमिका साकारताना दिसेल. तर त्याला संगणक तज्ज्ञ म्हणून साथ देणार आहे स्वानंदी टिकेकर. स्वानंदीचे हे व्यावसायिक पहिलेच नाटक आहे.

नाटकात या दोन्ही पात्रांचे स्वभाव एकमेकांपासून फार भिन्न आहेत. पण एका प्रकरणाच्या निमित्ताने ते एकत्र येतात आणि नाटक पुढे सरकत जाते. ‘एक शून्य तीन’ हा खरा तर महिलांसाठीचा हेल्पलाइन क्रमांक आहे. या नंबरचा या नाटकासाठी फक्त एक सूचक म्हणून वापर करण्यात आला आहे. यामुळे लोकांना हा क्रमांकही कायमचा लक्षात राहील हा या मागचा सुप्त हेतूही आहे.

या नाटकात सुमीत आणि स्वानंदीसह संजय देशपांडे, सागर आठलेकर, नम्रता कदम आणि सुदीप मोडक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे. सुदीपने या नाटकाचे लेखनही केले आहे. येत्या ३ डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे येथे ४ वाजता होणार आहे.