गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले असून त्याचा तपास सीबीआयची विशेष टीम करत आहे. मात्र सोशल मीडियावर रियाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. यामध्येच आता बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा दिला आहे. तसंच रियावर टीका करणाऱ्यांना खडे बोलदेखील सुनावले आहेत.

कलाविश्वातील खटकणाऱ्या गोष्टींवर बेधडकपणे व्यक्त होणारी गायिका सोना मोहपात्रा हिने रियाला पाठिंबा दिला आहे. तसंच सोशल मीडियावर रियाला ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणीदेखील केली आहे. सोनाने ट्विट करत तिचं मत मांडलं आहे.

“सुशांतचं निधन होणं ही खरंच एक धक्कादायक गोष्ट आहे आणि त्याला न्याय मिळालाच पाहिजे. पण याविषयी कोणीच काही प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र रियाला अनेक जण विषकन्या म्हणत आहेत. तिचे बोल्ड, बिकिनीमधील फोटो शेअर करत आहेत. हे कितपत योग्य आहे. बास्स आता खूप झालं”, असं ट्विट सोना मोहपात्राने केलं आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सोनाच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोना मोहपात्राप्रमाणेच रियाला तापसी पन्नू, विद्या बालन, शिबानी दांडेकर या अभिनेत्रींनी पाठिंबा दिला आहे. तसंच आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत रियाला दोषी ठरवू नये असंही या अभिनेत्रींनी म्हटलं आहे.