वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. आपल्याकडे बालकलाकार सहसा नंतर कारकीर्दीत स्थिरावत नाहीत, असा अनुभव जास्त आहे. मात्र छोटय़ा पडद्यावरून रुपेरी पडद्यावरचा चॉकलेट बॉय हा प्रवास यशस्वीपणे करणारा अभिनेता स्वप्निल जोशी याला अपवाद ठरला आहे. अभिनेता, सूत्रसंचालक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून सध्या प्रेक्षकांसमोर येत असलेला स्वप्निल आगामी ‘रणांगण’ या चित्रपटात पहिल्यांदाच खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातही त्याने सहनिर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी पेलली आहे. एक कलाकार म्हणून आशयघन आणि व्यावसायिक भूमिका दोन्हीचे अफलातून मिश्रण असलेले काम करायला मिळते आहे त्यामुळे आपण खूप खूश आहोत, असं तो सांगतो.

गेले वर्षभर एक कलाकार म्हणून तू काहीतरी नकारात्मक व्यक्तिरेखा करून बघ, अ‍ॅक्शनपॅड तुझ्या आताच्या ‘चॉकलेट हिरो’ प्रतिमेला छेद देणारं असं काहीतरी कर, अशी मागणी चाहत्यांकडून होत होती. त्याच वेळी माझ्याकडे ‘रणांगण’ची पटकथा आली. हा चित्रपट हिंदीतील ‘सरकार’च्या तोडीचा आहे मात्र त्यात मारधाड जास्त होती. या चित्रपटात जे रणांगण आहे ते नात्यांमधील द्वंद्वाचं आहे त्यामुळे ते सर्वार्थाने वेगळं ठरणार आहे, असं मत स्वप्निलने व्यक्त केलं. या चित्रपटात स्वप्निल आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

दोन ताकदवान कलाकार यात आमनेसामने असल्याने या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. गेली काही वर्षे सातत्याने वेगळे चित्रपट, भूमिका करायचा प्रयत्न करतो आहे. ‘फ्रेंड्स’, ‘लाल इश्क’ नंतर गेल्या वर्षी ‘फुगे’ केला, ‘भिकारी’ केला. आता यापेक्षा आणखी काही वेगळं करून बघू असा विचार होता. ‘रणांगण’मधील खलनायकी व्यक्तिरेखेच्या रूपाने ही संधी चालून आली, असं तो म्हणतो.

या खलनायकी व्यक्तिरेखेबद्दलचं वेगळेपण स्पष्ट करतानाही स्वप्निल चित्रपटात जो संघर्ष आहे तो पितापुत्राच्या नात्यातील आहे याकडे लक्ष वेधतो. मी आधी स्पष्ट केलं तसं की या चित्रपटातलं द्वंद्वं किंवा रणांगण आहे ते नात्यांचं आहे. त्यामुळे यातली माझी भूमिका ही पूर्णत: नकारी आहे. म्हणजे त्याच्या स्वभावाचा कोणालाच अंदाज लागणार नाही असा बेभरवशी आणि अतिशय हरामखोर म्हणता येईल, अशी ही व्यक्तिरेखा आहे. आणि त्यामुळेच ही भूमिका जास्त अवघड गेली असं त्याने सांगितलं. या चित्रपटात त्याला लुकही पूर्ण वेगळा देण्यात आला आहे. लांब केस आणि चेहऱ्यावरचा कठोरपणा या गोष्टी ‘रणांगण’च्या टीझरमध्येही पाहायला मिळतात.

माझा लुक करायला सेटवर खूप माणसं होती, मात्र खलनायकी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तासन्तास त्या भूमिकेत शिरून ते भाव चेहऱ्यावर कायम एकसारखे ठेवायचे हे आव्हान होतं. दुसरं म्हणजे या भूमिकेसाठी मला कुठलेच संदर्भ नव्हते. कथेच्या अनुषंगाने त्याची व्यक्तिरेखा, तो कसा वागेल-दिसेल-बोलेल यावर चर्चा करून मग त्या पद्धतीने ते साकारायचं हे अंमळ अवघड होतं. मात्र सचिन पिळगावकर आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यासह सगळ्याच टीमने दिलेल्या सहकार्यामुळे ही भूमिका करणं सोपं गेलं असंही तो म्हणतो. दोन चांगल्या कलाकारांमधली अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी फार कमी चित्रपट देतात. ही संधी ‘रणांगण’च्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळाली आहे आणि या चित्रपटासाठी म्हणून आमच्या दोघांचीही निवड निर्माता-दिग्दर्शकांनी केली होती, अशी माहिती स्वप्निलने दिली.

सचिन पिळगावकर यांना मी वडिलांसमान मानतो. त्यामुळे आमच्यात तसं नातं आधीपासूनच आहे हे अनेकांना माहिती आहे. या नात्याचा खूप फायदा चित्रपट करताना झाल्याचं स्वप्निलने सांगितलं. वेगळ्या भूमिका, वेगवेगळे प्रयोग करत राहणं ही आजच्या कलाकारांची गरज असल्याचं तो आवर्जून नमूद करतो. माझ्याही बाबतीत ते खरं आहे, पण मी नेहमी म्हणतो की काहीतरी वेगळं करायचं म्हणून ते ओढूनताणून करू नये. तुम्हाला साजेल अशी ती भूमिका तुमच्याकडे सहज यायला हवी, हा माझा पहिल्यापासून विचार होता. आणि घडलंही तसंच.

चांगली वागणारी माणसं नकारी किंवा वाईट असूच शकत नाहीत, हा एक ठाम समज असतो. याउलट, कुठल्या तरी घटनेमुळे, प्रसंगामुळे चांगली माणसं वाईटाकडे वळली तर ती सगळ्यात जास्त दहशत निर्माण करतात. त्याच पद्धतीने माझी खलनायकी व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे. आणि चेहऱ्यावरून मी वाईट वाटत नसल्याने त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. कित्येक तास कोणाशी न बोलता बसायचं असे अनेक उद्योग मी या भूमिकेसाठी केले आहेत, असंही त्याने सांगितलं.

अभिनेता म्हणून एकापाठोपाठ एक चित्रपट असतानाच त्याने निर्मात्याच्या भूमिकेतून ‘स्टार प्रवाह’वर ‘नकळत सारे घडले’सारखी मालिका केली, ‘रणांगण’मध्येही तो सहनिर्माता आहे. अचानक निर्मिती क्षेत्रात उतरण्यामागचं कारण स्पष्ट करताना गोष्टी सांगण्याची आवड त्याला कारणीभूत ठरल्याचं तो म्हणतो. मला गोष्ट सांगायला खूप आवडते.

एक कलाकार म्हणून वर्षभरात मला किती गोष्टी सांगता येतील, याला मर्यादा आहेत. त्यामुळे निर्मात्याच्या भूमिकेतून का होईना चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतील, या विचाराने आपण निर्मिती क्षेत्रात शिरल्याचं त्याने सांगितलं. मात्र निर्मिती माझी आहे म्हणून त्यात कामही मीच करणार असा आपला अट्टहास नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

अर्थात, निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर मग त्यांच्या समस्या जास्त लक्षात आल्या, येतात अशी कबुलीही त्याने दिली. कलाकार ते निर्माता असा प्रवास झाला आहे; मग तो दिग्दर्शनाकडेही वळणार का?, यावर नाही क शालाच म्हणू नये.. असं तो हसत सांगतो. कलाकार म्हणून मला अजून मोठी कारकीर्द आहे त्यामुळे आत्ताच दिग्दर्शनाची घाई कशाला? गोष्ट सांगायची हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा होतो तो सध्या निर्माता म्हणून पूर्ण होतोय असे सांगतानाच भविष्यात दिग्दर्शक म्हणूनही येऊ शकू अशी आशाही त्याने व्यक्त केली.

एकीकडे त्याचा ‘रणांगण’ हा खलनायकी भूमिका असलेला चित्रपट ११ मेला प्रदर्शित होतो आहे. तर दुसरीकडे ‘पुणे मुंबई पुणे ३’ या सिक्वलपटाचेही चित्रीकरण सुरू असल्याचे त्याने सांगितले. त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. एकीक डे व्यावसायिक मूल्य असलेला ‘पुणे मुंबई पुणे ३’सारखा कौटुंबिक मनोरंजनपर चित्रपट तर दुसरीकडे अभिनयाचे समाधान देणारा ‘रणांगण’ अशा नानाविध भूमिका करायला मिळत असल्याबद्दल त्याबद्दलचं समाधानही त्याच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतं. त्यामुळे या वर्षी तरी स्वप्निलच्या चाहत्यांना त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार असल्याने सध्या तरी तक्रारीला जागा उरलेली नाही.