मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे नेहमीच चर्चेत असते. ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षीच ऋताने मुंबईत स्वत:चे हक्काचे घर घेतले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. एका मुलाखतीत ऋताने तिच्या नवीन घराबाबात भाष्य केले आहे.

ऋताने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, ऋताने नवीन घर घेण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. ऋता म्हणाली, “मी कधीच स्वत:च्या घरात राहिलेली नाही. गेली ३० वर्षं मी आई-बाबांबरोबर भाड्याच्या घरात राहत आले आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास ११ घरं बदलली आहेत. मला फार मोठं घर नको होतं. पण, मला नेहमी असं वाटायचं की, उद्या माझं लग्न झाल्यानंतर आपलं एक हक्काचं घर असावं जिथून माझ्या आई-वडिलांना कुणी काढून टाकणार नाही.”

हेही वाचा- शुभमंगल सावधान ! ‘इश्कबाज’फेम अभिनेत्री सुरभी चंदना अडकली लग्नबंधनात; पाहा व्हिडीओ अन् फोटो

ऋता पुढे म्हणाली, “मला माझ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे होते. त्यामुळे काहीही करून मला घर घ्यायचंच होतं. देवाच्या कृपेनं कोणत्याच गोष्टीत मला तडजोड करावी लागलं नाही. मी आता एखादा प्रोजेक्ट करून सहा महिने निवांत फिरू शकते. त्यामुळे मी आता माझ्या भावाला सांगते की, काहीच विचार करायची गरज नाही.”

ऋता दुर्गुळेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत तिने सुपरहिट मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. शुक्रवारी (ता. ८) ऋताचा ‘कन्नी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज व ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा- वाइल्ड कार्ड स्पर्धक मनीषा रानी ठरली ‘झलक दिखला जा ११’ ची विजेती, आंतरराष्ट्रीय ट्रिपसह मिळाली ‘इतकी’ रक्कम

ऋता दुर्गुळेने १८ मे २०२२ रोजी दिग्दर्शक प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली. कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नातील ऋता व प्रतीकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.