‘कलर्स मराठी’ वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या एका नव्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम म्हणजे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके डॉ. निलेश साबळे यांच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता २७ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या या नव्या कार्यक्रमाचे नवनवीन प्रोमो प्रदर्शित होत आहेत.

नुकताच ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित असणार आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – आशुतोषच्या अपघाती निधनानंतर सतत रडून अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता ‘हा’ आजार, म्हणाली, “माझ्या छातीवर…”

शिवाय या प्रोमोमध्ये भाऊ कदम आणि ओंकार भोजने महिलेच्या वेशात दिसत आहेत. त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्रींचा लूक केला आहे. हेच पाहून नेटकरी ‘चला हवा येऊ द्या’सारखाच हा कार्यक्रम असल्याचं म्हणत आहेत.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या प्रोमोवर एका नेटकरीने लिहिलं आहे, “साडी नेसून कॉमेडी करायची काय गरज?” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बायकांचे रोल करायला बायका मिळत नाहीत का?” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “फॉरमॅट तोच आहे फक्त नाव नवीन आहे.”

हेही वाचा – मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली क्षिती जोग, म्हणाली, “ते घातल्याने…”

दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रम २७ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने व्यतिरिक्त सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण असे अनेक कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत.