‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-चैतन्यच्या भांडणाचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन आणि सायली मिळून गेले अनेक दिवस चैतन्यचं साक्षीविरोधात मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, तो काही केल्या दोघांचंही ऐकत नाही. अशातच नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात चैतन्य साक्षीला घेऊन सुभेदारांच्या घरी आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेऊयात…

कॉलेजच्या रियुनियन पार्टीवरून घरी आल्यावर सायली अर्जुनला त्याच्या कॉलेजमधला एक जुना फोटो दाखवते. त्यामध्ये कुणालबरोबर उभी असलेली मुलगी साक्षी असल्याचं सायली अर्जुनला सांगते. बायकोने दाखवलेला फोटो पाहून अर्जुनला धक्का बसतो. कारण, साक्षीने लग्नासाठी नकार दिल्याने कुणालने आत्महत्या केलेली असते. या सगळ्या कोड्याची उत्तर मिळाल्यावर अर्जुनला चैतन्यची काळजी वाटू लागते. तो त्याला ताबडतोब फोन करून घरी ये असं सांगतो. परंतु, चैतन्य खरं-खोटं करण्यासाठी साक्षीला सुभेदारांच्या घरी घेऊन येतो.

हेही वाचा : “Happy birthday राव”, नवऱ्याच्या वाढदिवशी मृण्मयी देशपांडेची खास पोस्ट; म्हणाली, “तुझ्या पाठीशी…”

चैतन्यबरोबर साक्षीचं येणं कोणालाही रुचत नाही. अर्जुन सुद्धा मित्रावर खूप संतापतो. साक्षीबरोबर लग्न करू नकोस असा सल्ला दिल्यावर अर्जुन आणि चैतन्यमध्ये जोरदार भांडण होतं. दोन्ही जिवलग मित्रांचं भांडण पाहून सायलीला प्रचंड काळजी वाटते. ती मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते. एकीकडे चैतन्य साक्षीच्या जाळ्यात अडकत असताना दुसरीकडे, सायली-अर्जुनचं नातं आणखी घट्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “आम्ही स्त्रिया…”

‘ठरलं तर मग’ मालिकेचा खास एपिसोड येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अर्जुन सायलीला माझ्याकडे फक्त १५ मिनिटे आहेत असं सांगतो. यावर सायली आणि अर्जुनचं १५ मिनिटांच्या डेटवर जाण्याचं ठरतं. हे दोघे जोडीने स्कूटरवर बसून फिरायला जाणार आहेत. आता अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली केव्हा देणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.