दिशा पटानी हे बॉलिवूडमधील सध्याचे परिचित नाव आहे. ‘एम एस धोनी’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारलेल्या दिशाच्या सौंदर्यावर चाहते फिदा होताना दिसतात. फार कमी वेळातच आपला मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यात ती यशस्वी झाली आहे. नुकतंच तिने एका प्रसिद्ध ‘स्टार किड’ला मागे टाकत बिग बजेट चित्रपट मिळवला आहे. तामिळ ऐतिहासिक ड्रामा चित्रपट ‘संघमित्रा’मध्ये ती मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘संघमित्रा’ या चित्रपटावर जवळपास १५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुरुवातीला यातील मुख्य भूमिकेसाठी कमल हसनची मुलगी श्रुती हसनला विचारण्यात आलं होतं. मात्र आता श्रुतीच्या जागी दिशाची वर्णी लागणार असून डिसेंबरमध्ये शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या सूत्रांनी दिली आहे. दिशासाठी ही भूमिका अविस्मरणीय ठरणार असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे. तामिळसोबत तेलुगू भाषेतही ‘संघमित्रा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाय याचा हिंदी रिमेकही होणार असून त्यात संपूर्ण वेगळी स्टारकास्ट असेल. मात्र हिंदी रिमेक येण्यास बराच काळ लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

VIDEO : मादाम तुसाँमध्ये आशाताईंच्या पुतळ्याचे अनावरण

सुंदर सी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती ‘श्री थेनान्डल फिल्म्स कंपनी’ करणार आहे. यामध्ये दिशासोबतच जयम रवी आणि आर्या या दाक्षिणात्य कलाकारांचीही भूमिका असणार आहे. तर ए. आर. रहमान या चित्रपटाला संगीत देणार आहेत. सध्या दिशा ‘बागी २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये प्रियकर टायगर श्रॉफसोबत ती झळकणार आहे.