सडपातळ बांध्याचा रणबीर कपूर आणि अडदांड शरीरयष्टीचा संजय दत्त या दोघांचीही देहबोली पाहिली तर त्यांच्यामध्ये दूर दूर पर्यंत कोणतेही साधर्म्य आढळत नाही. पण, तरीही रणबीर कपूर संजय दत्तच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये संजूबाबाच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ज्यावेळी संजय दत्तची निवड केल्याचे जाहीर केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. किंबहुना खुद्द संजय दत्तसुद्धा रणबीरच्या भूमिकेविषयी साशंक होता. पण, रणबीर सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी घेत असलेले कष्ट पाहता अनेकांचे शंकानिरसन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संजय दत्तच्या देहबोलीपासून ते अगदी त्याच्या वागण्याबोलण्याच्या वेगळ्याच शैलीपर्यंत सारे काही रणबीर चांगलेच आत्मसात करत असल्याचे त्याचे फोटो पाहून लक्षात येत आहे. रणबीर सध्या संजय दत्तच्या भूमिकेसाठी फार मेहनत घेत असून त्यासाठी तो काही कार्यशाळांनाही हजेरी लावत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरने संजय दत्तच्या देहबोलीचे बारकाव्याने निरीक्षण करण्यासाठी जवळपास २५० वेळा संजय दत्तचे चित्रपट, काही व्हिडिओ आणि मुलाखतीचे फूटेज पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे संजय दत्तचा प्रवास रुपेरी पडद्यावर उतरविणार असून या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच संजय दत्त आणि रणबीर कपूर चांगलेच प्रकाश झोतात आले आहेत. या चित्रपटाचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. मात्र संजूबाबाची भूमिका आणि त्याच्या आयुष्याशी निगडीत काही व्यक्तिरेखांच्या भूमिका जवळ जवळ पक्क्या झाल्या आहेत. संजय दत्तवरील बायोपिकच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच फक्त आणि फक्त काही चर्चांच्या बळावर हा चित्रपट प्रकाशझोतात आला आहे. रणबीर सुद्धा य़ा चित्रपटासाठी फार मेहनत घेत आहे.

संजय दत्तची शरीरयष्टी, त्याची चेहरेपट्टी हे सर्वकाही वास्तवदर्शी दाखविण्यासाठी रणबीरने १३ किलो वजन वाढविले आहे. रणबीरने आजवर त्याच्या विविध चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी बरीच मेहनत घेत त्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या नव्या कोऱ्या रुपामध्येही तो संजूबाबाच्या ऑनस्क्रिन भूमिकेला नक्कीच न्याय देईल असे म्हटले जात आहे.

ranbir-1

ranbir-2

ranbir-3

या चित्रपटात रणबीरसोबतच सोनम कपूर आणि अनुष्का शर्मासुद्धा झळकणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. अनुष्का यात पत्रकाराची तर सोनम ही संजूबाबा प्रेमात पडलेल्या त्याच्या एका प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री दिया मिर्झाची देखील या चित्रपटात वर्णी लागली आहे. यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिया मिर्झा, विकी कौशल, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर या अभिनेत्री रणबीरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.