सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना बेधडक उत्तर देण्यासाठी अभिनेत्री तापसी पन्नू चांगलीच प्रसिद्ध आहे. ट्विटरवर एका युजरने तिला, ‘तू भारतीय आहेस का’ असा प्रश्न विचारला असता तिने सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंड बंद केलं.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुरुद्वारा नानकाना साहिबवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केल्याची बातमी तापसीने ट्विटरवर शेअर केली होती. त्यानंतर तिला तिच्या नागरिकत्वावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तापसी म्हणाली, ‘आता तुम्हाला पण कागदपत्रे दाखवावी लागतील का?’

चालू घडामोडी व बऱ्याच सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर तापसी अनेकदा सोशल मीडियावर बेधडकपणे वक्तव्य करताना दिसते. अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती युजर्सना जशास तसं उत्तर देते.

तापसीच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘थप्पड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पतीने हात उगारल्यानंतर लग्न मोडण्याच्या विचारात असलेल्या एका महिलेची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करणार आहेत. याआधी तापसी आणि अनुभव यांनी ‘मुल्क’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. ‘थप्पड’ हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.