अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यामुळे या आता प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका होत आहे. मात्र ही टीका अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. केवळ मनोरंजन करण्यासाठी एका व्यक्तीचं आयुष्य पणाला लावू नका असं मत तिने व्यक्त केलं आहे.

ट्विंकल खन्ना हिने एक लेख लिहून सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण मला आता जादुच्या खेळासारखं वाटतंय. ज्या प्रमाणे जादुगार आपला खेळ दाखवण्यापूर्वी लोकांचं मनोरंजन करतो त्याचप्रमाणे रियाचं मीडिया ट्रायल सुरु आहे. मला प्रश्न पडतोय माध्यमांमधील हे जादुगार कॅमेरा बंद झाल्यावर स्वत:ला काय विचारत असतील? लाखो लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्ही एका व्यक्तीचं आयुष्य पणाला लावत आहात.” अशा आशयाचा ब्लॉग लिहून ट्विंकलने रियाला पाठिंबा दिला आहे.

अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.