बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या आशुतोष गोवारीकर आणि प्रेरणा अरोरा या जोडीविषयी चर्चा ऐकायला मिळत आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने आतापर्यंत ‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारखे अप्रतिम चित्रपट बॉलिवूडला दिले. तर दुसऱ्या बाजूस ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, ‘फॅनी खान’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमुळे प्रेरणा अरोरा प्रकाशझोतात आली होती. लवकरच निर्माता-दिग्दर्शकाची ही जोडी एकत्र येणार आहे. प्रेरणा अरोरा ही क्रिअर्ज या प्रॉडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे.

गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदारो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करु शकला नव्हता. मात्र, हे अपयश बाजुला सारून आशुतोष आता दोन नवे चित्रपट घेऊन येत आहे. यासाठी प्रेरणा आशुतोषला मदत करणार असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलं आहे. यापैकी पहिल्या चित्रपटाची सहनिर्मिती गोवारीकर आणि क्रिअर्ज करणार असून दिग्दर्शक कोण असेल, हे अद्याप नक्की झालेले नाही. तर दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती क्रिअर्ज करणार असून त्याचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करणार आहे.

वाचा : उद्याच्या सूर्योदयासोबत राणी ‘पद्मावती’ येणार तुमच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी गोवारीकर एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याची चर्चा होती. यामध्ये फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असेल असं म्हटलं जात होतं. मात्र, आता ते वेगळ्याच प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतंय.