पंकज त्रिपाठी हे नाव आता बॉलिवूडमध्ये परिचयाचं झालं आहे. ‘मसान’पासून ‘मिर्झापूर’पर्यंत अनेक चित्रपट, सीरिजमध्ये काम करत पंकज यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. ‘मिर्झापूर २’ या सीरिजमधील पंकज यांची कालिन भय्या ही भूमिका विशेष गाजली. पंकज यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी शाळेत असताना अनेक नाटकांमध्ये काम केले आहे याचा खुलासा त्यांनी एका शोमध्ये केला आहे.

नुकतीच पंकज यांनी ‘नो फिल्टर नेहा’ या नेहा धूपियाच्या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी लहानपणी गावात होणाऱ्या नाटकांमध्ये एका महिलेची भूमिका साकारली होती आणि त्यांची ती भूमिका गावातील लोकांना विशेष आवडली असल्याचे सांगितले आहे.

‘मी जेव्हा दहावीत होतो तेव्हा पहिल्यांदा एका मुलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी जो मुलगा नाटकात नेहमी महिलेची भूमिका साकारत होता तो आलाच नव्हता. लोकांना वाटले होते की त्यावर्षी गावात नाटक होणार नाही. कारण तो मुलगा आला नव्हता. तेव्ही मी स्वत: या नाटकात सहभागी होण्याचा निर्णय घेतला’ असे पंकज यांनी म्हटले.

पुढे पंकज यांनी म्हटले, ‘नाटकाचे दिग्दर्शक राघव काका यांनी मला वडिलांची परवानगी घेण्यास सांगितले होते. कारण माझ्या वडिलांना मी नाटकात महिलेची भूमिका करणे आवडले नसते. पण त्यांनी मला ही भूमिका साकारण्याची परवानगी दिली. मला जे आवडेल ते मी करावे असे त्यांनी मला सांगितले. त्यावेळी मी नाटकात महिलेची भूमिका साकारली होती त्याचबरोबर आयटम साँग देखील केले होते. ज्याची गरजही नव्हती. पण लोकांना माझा डान्स प्रचंड आवडला होता.’