25 September 2020

News Flash

डबक्यातले बेडूक

डबक्याची मानसिकता असलेल्यांमध्ये रमण्याचा वा त्यांच्याशी जमवून घेण्याचा अट्टहास टाळावा.

बेडकांच्या (काल्पनिक नाव) घरी एखाद्याला राहणं अगदी डाव्या हातचा मळ. पण तो ‘एखादा’ म्हणजे ‘जगायचं म्हणून जगणारा’ हवा. फार फार तर कधीतरी क्वचित हे जगणं ‘जीवन’ म्हणून जगणारा. हे वर्णन चमत्कारिक वाटेल, परंतु सर्व साधनांची उपलब्धता असूनही संकुचित ध्येय, अभिलाषा, आकांक्षा, उद्देश व प्रयोजन बाळगणारे लोक आपल्या आसपास आढळतात. ही मानसिकता वैराग्यातून न येता ती खरं तर निष्क्रियतेतून आलेली असते. ‘No failure, but low aim is a crime’ असे म्हणतात. पण हे डबक्यातले बेडूक ‘low aim is a way of life and high aim is useless and empty’ असे ठामपणे मानतात.
यांची ही थोडकी ध्येयं आणि चर्चा केवळ ‘संसार’ या संकल्पनेशी जोडलेली. ‘आज अमक्या भाजीत आमसूल घाला बरं का!’, ‘उडदाची डाळ आणून वाळत घालायची आहे’ किंवा ‘अमक्या दुकानातल्या वडय़ांना हल्ली पूर्वीसारखी चव नाही!’ ही याची काही उदाहरणे. या गोष्टी निश्चितच महत्त्वाच्या असतात. परंतु घरात अखंड फक्त आणि फक्त ताक-भाताच्याच गप्पा होत राहिल्या तर आपल्या समाजाचं, देशाचं भवितव्य काय? प्रत्येकाने आपला संसार व खासगी आयुष्य मूल्याधारित आणि शिस्तीने जगावं, हे योग्यच. परंतु आपल्या वैयक्तिक आयुष्यापुरतीच ध्येयं असणारे लोक व्यापक सामाजिक व राष्ट्रीय ध्येयांसाठी कितीसे उपयोगी ठरणार? असे कोटय़वधी संसार कोणत्याच दुव्याने (व्यापक ध्येयांनी) बांधले गेलेले नसतील तर देशाला एकसंध राष्ट्र तरी कसे म्हणावे? जेस्टॉल्ट मानसशास्त्र विचारधारेनुसार- ‘whole is greater / more than sum of it’s parts’ असे मानले जाते. म्हणजेच निव्वळ बेरीज म्हणून एक आकडा (निष्कर्ष) मिळणे याच्यापेक्षा त्या निष्कर्षांचे स्वरूप खूप व्यापक असते. त्यामुळे असंख्य नीटनेटके संसार हे आनंदी समाज निर्माण करण्यात योगदान जरूर करतील, परंतु त्यांच्या निव्वळ अस्तित्वाने आनंदी समाज घडणार नाही. तो घडेल- प्रत्येक संसारी माणसाने बाळगलेल्या व्यापक ध्येयांमधून, डबक्यातून उसळी मारून समुद्रात पोहोण्याची मानसिकता दर्शविण्यातून!
अशा मानसिकतेच्या लोकांना ध्येयं नसतात असे नाही. परंतु ती इतकी संकुचित व स्वकेंद्रित असतात, की व्यापक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांना अशांच्या सहवासात राहणे कठीण. नवनवीन शिकण्याच्या संधी, आव्हानात्मक कामगिरी व वाढीव जबाबदाऱ्या यांच्या अंगावर काटा आणतात. विश्लेषणात्मक वा समाजोपयोगी विषयांवर चर्चा रंगलेली असताना हे किराणा मालाची महागाई किंवा हवापाण्याबद्दल बोलायला लागतील. त्यांच्यासाठी सामाजिक विषय म्हणजे हेच. त्यांना अशा व्यापक विषयांवरील चर्चा वायफळ वाटतात. विश्लेषणात्मक चर्चा टळावी म्हणून ते कधी कधी महत्त्वाच्या विषयांबद्दल ‘हे मुळात महत्त्वाचेच नाहीत’ किंवा ‘ते अस्तित्वातच नाहीत, लोकांनी उगाच त्यांचा बागुलबुवा केला आहे’ अशी मतं मांडतात. याचे कारण हेच, की क्लिष्ट विषय वा ध्येयं त्यांना झेपत नाहीत. बौद्धिकदृष्टय़ा हे न झेपणाऱ्या किंवा अर्थार्जनाच्या धकाधकीत असणाऱ्या तसेच दैनंदिन जीवनातील अडचणींचा सामना करणाऱ्या असहाय व्यक्तींची आपण यात गणती करणे अयोग्य होईल. म्हणजे ज्या बिचाऱ्यांना दोन वेळच्या भाकरीचीच चिंता आहे, त्यांनी या चर्चेत किती वेळ व्यतीत करावा, हे ज्याच्या-त्याच्यावरच अवलंबून आहे. परंतु असे असूनही इतिहास हेच सांगतो, की क्रांती ही अशी तळमळ बाळगणाऱ्या, स्वत: असहाय असूनही इतरांना जमेल तितके सहाय्य करणाऱ्यांकडूनच घडून आलेली आहे.
सखोल विषयांबद्दलची अनास्था बऱ्याच लोकांत आढळते. कदाचित म्हणूनच काही उथळ विषयांवरील कादंबऱ्या ‘बेस्ट सेलर’ ठरून त्यांचा खप तात्त्विक व तर्कशुद्ध पुस्तकांपेक्षा नेहमीच जास्त आढळतो. कोणी हा व्यक्तिगत आवडीनिवडीचा प्रश्न असल्याचेही म्हणू शकेल. आणि तसे असेलही. परंतु नेहमीचे सवयीचे, सोयीचे आणि सोपे कवटाळून बसण्यात कसलाच धोका वा आव्हान नसल्याने डबक्यातल्या बेडकांची मानसिकता जोपासणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो. परंतु खोल विषयांची आवड असणाऱ्या, किंबहुना ते झेपू शकणाऱ्या लोकांना या अतिसामान्य (Mediocrity) गोष्टींशी जमवून घेणे कठीण. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि संयमामुळे ते यातूनही मार्ग काढतात. त्यामुळे अतिसामान्य ध्येयं जोपासणाऱ्या व्यक्तींच्या कळपात सापडल्यास व आपण तशी ध्येयं जोपासणारे नसल्यास काय करावे ते पाहू..
प्रथम आपली ध्येयं काय आहेत याचा अभ्यास करावा. ही ध्येयं व्यक्तीप्रगतीनिष्ठ व समाजनिष्ठ असल्यास त्याचा आनंद मानावा; अहंकार नव्हे. ती मग एककल्ली वा आत्मकेंद्रित स्वरूपाची न राहता सामूहिकतेला महत्त्व देणारी व वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक स्वास्थ्य दृष्टिक्षेपात ठेवून योजिलेली व्यापक ध्येयं बनतात. अशी ध्येयं ‘मी’ व ‘माझ्याबरोबरीने’, ‘आम्ही’ व ‘आमचे’ यावर आधारित असतात. ही ध्येयं उत्तम मानण्यास हरकत नसावी. उदा. ‘माझ्या कुटुंबाच्या सांसारिक गरजा भागवण्याचे मी ध्येय बाळगीन. अर्थनियोजन नेटाने करीन आणि माझे वैयक्तिक व कौटुंबिक ध्येय साधताना इतर कोणाचीही फसवणूक करणार नाही. तसेच माझ्या देशाच्या आर्थिक धोरणांकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहीन आणि सुजाण नागरिक म्हणून या क्षेत्रात जे योगदान करता येईल ते अवश्य करीन.’
नंतर आपल्या आजूबाजूच्यांच्या ध्येयांचा आढावा घ्यावा. ती सरस असल्यास त्यातून प्रेरणा घ्यावी. परंतु ती संकुचित भासल्यास त्यांना कमी न लेखता त्यामागील कारणांचा मागोवा घ्यावा. म्हणजेच डबक्यातील मानसिकता त्यांच्यावर दारुण परिस्थितीने लादली आहे की तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच पैलू आहे, हे तपासावे. त्यांच्या ध्येयपातळी वाढवण्याचा जरूर प्रयत्न करावा, परंतु त्यांची इच्छाशक्तीही त्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येकाची झेप घेण्याची वेळ, पद्धत आणि इच्छाशक्ती भिन्न असते हे नेहमी लक्षात ठेवावे. त्यामुळे आपल्याला जे उच्च ध्येय वाटेल ते तसेच इतरांनाही वाटले पाहिजे, हा हट्ट मात्र उपयोगाचा नाही.
डबक्याची मानसिकता असलेल्यांमध्ये रमण्याचा वा त्यांच्याशी जमवून घेण्याचा अट्टहास टाळावा. त्यांना न दुखावता, हिणवता आपला व्यापक ध्येय साधण्याचा मार्ग आक्रमावा. त्यांच्या निष्क्रियतेमुळे खच्ची न होता, निरुत्साही न होता आपले मार्गक्रमण करावे. समविचारीच नव्हे, तर व्यापक दृष्टिकोन बाळगणाऱ्या आणि तो दृष्टिकोन वर्तनात उतरवणाऱ्या व्यक्तींच्या संगतीत वेळ घालवण्यास प्राधान्य द्यावे. हे डबक्यातले बेडूक त्यांच्या नकारात्मक आणि संकुचित धोरणाद्वारे आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात ऊर्जा फुकट घालवण्यापेक्षा आपला ध्येयनिष्ठ जगण्याचा आग्रह आणि सचोटी कायम ठेवावी. अशाने ते प्रेरित होऊन आपल्याला जोडले तरी जातील किंवा डबक्यालाच समुद्र मानत राहतील; परंतु आपल्यावर त्यांची ही मानसिकता लादणे थांबवतील.
हे सर्व करताना आपलेच ध्येय काय ते व्यापक, उत्तम, नेमके आणि योग्य असा अहंकार न बाळगता विनम्रतेने त्याचा पाठपुरावा करावा. डबक्याबाहेर उडी मारून समुद्रात पोहण्याचा मानस व तसे वर्तन सोपे नसून अतिशय धीराचे व धाडसाचे काम आहे. त्यामुळे आपल्या मर्यादांचेही योग्य अवलोकन करावे. आणि या मर्यादा म्हणजे अडथळा मानण्यापेक्षा निराळा मार्ग निवडण्याची संधी मानावी आणि अशी झेप एकदा तरी घेऊन पाहावीच.
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2016 1:19 am

Web Title: article on psychological people
Next Stories
1 नातं तुटताना..
2 जोडी नं. १
3 चहाडय़ा आणि बरेच काही..
Just Now!
X