25 May 2020

News Flash

कह ‘ना’ है ..

आई-वडिलांची इच्छा राहुलने इंजिनीयर व्हावं ही आहे, परंतु राहुलला चित्रकार व्हायचंय.

प्रथम स्वत:शी आणि नंतर आपल्या जवळच्या व्यक्तींशी याबाबत चर्चा करावी. चर्चा करण्यासाठी योग्य व्यक्ती निवडाव्यात.

मानवी वर्तन-व्यवहाराची सखोल चिकित्सा तसेच त्यातील सकारात्मक बदलांबद्दल चर्चा करणारं मानसशास्त्रज्ञाचं साप्ताहिक सदर..
एकत्र कुटुंबपद्धतीत राहणाऱ्या प्रियाच्या घरात सुशोभीकरणाचे काम काढले आहे. प्रियाला आपल्या खोलीचे इंटिरिअर, भिंतींचे रंग आपल्या आवडीचे करायची इच्छा आहे. परंतु घरातल्या इतरांचा आग्रह हा, की प्रत्येकाच्या खोलीचे दृश्य स्वरूप हे एकंदर घराचे सुशोभीकरण व रंगसंगतीबरोबर मेळ घालणारेच असावे. त्यामुळे प्रियाचं मत डावललं जाऊ शकतं. तिचा याला स्वाभाविकच नकार आहे. पण..
आई-वडिलांची इच्छा राहुलने इंजिनीयर व्हावं ही आहे, परंतु राहुलला चित्रकार व्हायचंय. त्याला स्वत:चा कलास्टुडिओ काढायचा आहे. त्याच्यात ती क्षमताही आहे. पण आई-वडिलांनी त्याच्यासाठी घेतलेलं कष्ट, त्यांच्या इच्छा, आग्रह यांची त्याला जाणीव असल्याने त्यांच्या मनाविरुद्ध जाणं त्याला कठीण वाटतं आहे. त्याला स्वत:च्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण..
ऑफिसमध्ये रिया नुकतीच रुजू झाली आहे. कामात तरबेज, काम वेळेत पूर्ण करण्याची हातोटी या तिच्या गुणांमुळे इतर सहकारी आपली कामं तिच्याकडून करून घेतात. तिच्या भिडस्त स्वभावाचा गरफायदा घेतात. रियाला हे कळतं. तिच्या स्वत:च्या कामावरही त्याचा परिणाम होतो. पण त्यांना ‘नाही’ म्हणायचं कसं?
‘नाही’ म्हणणं किंवा नकार देणं ही अवघड गोष्ट असू शकते. आपल्यातल्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी, किंवा काहींना नेहमीच! या प्रक्रियेत आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी मागे ओढतात वा पुढे ढकलतात, हे जाणून घेणं उपयुक्त ठरेल. विचार, भावना आणि वर्तन हे घटक नेमकं काय घडवून आणतात, की आपण एखादा पर्याय निवडतो आणि दुसरा बाद करतो?! पाहू या..
स्वानुभूती नियमितपणे पडताळणे, ‘स्व’त्वाच्या कल्पना/ धारणांचा डोळस अभ्यास, ‘मी’ ही काय स्वरूपाची व्यक्तिरेखा आहे; नकारात्मक भावनांचा कितपत पगडा माझ्यावर आहे; सकारात्मक भावनांना वाव देऊन मी स्वत:ला किती प्रमाणात सशक्त करतो/ करते; एक व्यक्ती म्हणून मला आयुष्यात काय महत्त्वाचे वाटते; माझे ज्यांच्याशी भावनिक बंध आहेत अशा जवळच्या व्यक्तींच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे; माझ्या वैचारिक, भावनिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा काय आहेत; ज्यांच्याकडे मी जराही दुर्लक्ष करू शकत नाही, परंतु सद्य:स्थितीत दुर्लक्ष होत आहे; केवळ एखादा निर्णय घेण्याच्या/ पर्याय निवडण्याच्या दबावाखाली/ आग्रहाखातर माझ्याकडून होकार वा नकाराची अपेक्षा करणारी व्यक्ती कोण आहे व तिच्या इच्छा-आकांक्षा काय आहेत; तसेच मी त्या व्यक्तीच्या विनंतीला, इच्छा-अपेक्षांना, मागण्यांना, आग्रहाला नकार दिल्यास आमच्यातील नातेसंबंधावर काय परिणाम होऊ शकतात; आणि याचा कितपत प्रभाव माझ्यावर
किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींवर पडू शकतो? सद्य:स्थितीत व भविष्यकाळातही! ‘नाही’
म्हणण्याने ओढवलेल्या परिणामांना तोंड द्यायला मी किती सक्षम आहे, एखाद्या नकारार्थी निर्णयाने मला किती समाधान लाभणार आहे.. बाप रे! ही विचारप्रक्रिया वाचतानाच दमछाक झाली, हो ना! एखादा नकारार्थी निर्णय घेताना मनात विचारांची दाट गर्दी होण्यात काहीच नवल नाही. पण विचारांच्या या गर्दीतून मार्ग काढत, सर्व बाबींचा सखोल विचार करून, त्यावर उत्तर शोधून नकारार्थी निर्णय घ्यायला व समोरच्या व्यक्तीला तो सांगायला आपण स्वत:स नक्कीच सज्ज करू शकतो.
या विचारमंथनात ‘मी’ आणि ‘माझे’ जवळचे लोक यांचा सतत विचार होत असतो. आपल्याभोवती सतत आप्तेष्ट, मित्रमंडळी, संबंधित व सहकाऱ्यांचा गराडा असतो. आपल्या ते सवयीचे आहे. हा लोकसमूहच बऱ्याचदा आपली ओळख ठरवतो. या समूहाच्या व समाजव्यवस्थेच्या चालीरीती, आचार-विचार, धारणा, बंधनं, कक्षा यांच्याशी आपल्या वागणुकीचा ताळमेळ बसतो आहे की नाही, याचा कळत-नकळत आपण विचार करत असतो. त्यामुळे आपले निर्णय या विचारचौकटीत राहावेत अशी या समाजव्यवस्थेचीसुद्धा अपेक्षा असते. आपणही शक्यतो हे र्निबध वा नियम उल्लंघू नये याची खबरदारी घेत असतो. समाजव्यस्थेचा हा पगडा पाहता आपण एखादा चौकटबाहय़ नकारार्थी निर्णय घेतला तर हीच माणसं आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतरांची मनं व गरजांपेक्षा स्वत:च्या म्हणण्यास अधिक महत्त्व दिलं गेलं तर आपल्याला स्वार्थीपणाचे बिरुद लागू शकतं. त्यामुळे अशी बिरुदे आणि इतरांकडून होणारी अवहेलना टाळण्याच्या प्रयत्नांत आपली निर्णयक्षमता ढासळू शकते. आपण आपला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार गमावून एक पाऊल मागे घेतो. या दृश्य-अदृश्य दबावाला बळी पडून आपण आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करतो/ करत राहतो. इथून सुरुवात होते भरकटलेल्या विचारशून्य प्रवासाची.
या समस्येतून मार्ग कसा काढावा?
कोणत्याही गोष्टीतला आपला सहभाग, सहकार्य दर्शवण्याआधी- म्हणजेच होकार कळवण्याआधी आपण कोणकोणत्या गोष्टींना नकार देऊन हा निर्णय घेत आहोत याचा विचार प्रथम करावा. एक होकार म्हणज पर्यायाने कोणकोणत्या गोष्टींना नकार याचाही आढावा घ्यावा. आपल्या मनातील अनिश्चितता, शंका-कुशंका आपली काही स्वभाववैशिष्टय़े व पलू आपल्याला एखादा निर्णय घेण्यापासून वंचित करू शकतात. आपल्या आयुष्यात असे प्रसंग बऱ्याचदा उभे राहतात. ही एक स्वाभाविक गोष्ट आहे हे समजून घेऊन आपण आपली निर्णयक्षमता टिकवून ठेवू शकतो. एखादा निर्णय तात्पुरता तणाव निर्माण करणारा असला तरी काही काळानंतर त्याचा दाह व परिणाम कमी होणार आहे, ही शक्यता आशावाद निर्माण करणारी ठरते. ‘हो’ वा ‘नाही’ म्हणण्याचे तोटे आणि फायदे पाहावेत. त्यांचा ताळमेळ कसा बसतो आहे, कोणाचे पारडे जास्त जड दिसते, आणि आयुष्यावर याचा कितपत परिणाम होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं निर्णयाकरता दिशा देणारी ठरतील. कारण सतत दबावाखाली ‘नाही’ म्हणण्याऐवजी ‘हो’ म्हणत राहून आपलं मत डावलणं/ मन मारणं हे आपल्या स्वत:च्या मानसिक आरोग्यासाठीही मारक ठरेल.
प्रथम स्वत:शी आणि नंतर आपल्या जवळच्या व्यक्तींशी याबाबत चर्चा करावी. चर्चा करण्यासाठी योग्य व्यक्ती निवडाव्यात. या व्यक्ती अशा असाव्यात, की ज्यांचा आपल्यावर खऱ्या अर्थाने जीव आहे, ज्या आपले म्हणणे संयमाने ऐकून घेतील, नि:पक्षपातीपणे आपले मत मांडतील आणि आपण आपलाच सल्ला मानावा असा आग्रह अजिबात धरत नाहीत. प्रसंगी त्यांचं म्हणणं ऐकल्याने व त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केल्याने आपली बुचकळ्यात पडलेली मन:स्थिती सुस्थिर व्हायला मदत होऊ शकते. अशा व्यक्ती सतत आसपास असणं दरवेळी शक्य असेलच असं नाही. अशावेळी मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्यायला हरकत नसावी. ‘नाही’ म्हणण्याची, नकारार्थी निर्णय घेण्याची अचूक वेळ हीच आहे का, याचाही विचार होणं गरजेचं आहे. आताच ‘नाही’ म्हणावं की संयम राखावा, परिस्थितीचं अवलोकन करावं आणि निर्णय थोडासा पुढे ढकलावा, स्वत:साठी वेळ मागून घ्यावा, या सगळ्याचा प्रथम आढावा घ्यावा. पण आपला स्वभाव झटकन् सोक्षमोक्ष लावण्याचा असल्यास कदाचित घाई करून चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय आपल्याकडून घेतला जाऊ शकतो. हे टाळावे.
त्यामुळे निर्णय घेताना एक मंत्र लक्षात ठेवू या : थांबा.. पाहा.. चर्चा करा.. आणि योग्य वेळ निवडून योग्य त्या कुलुपाला योग्य ती चावी शोधून लावण्याचा मनापासून प्रयत्न करू या.
‘नाही’ म्हणण्याचे तीन मार्ग-
१) स्वत:शी वस्तुनिष्ठ चर्चा- स्वत:ला हे ठामपणे सांगणं, की निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. अशा निर्णयप्रक्रियेत निर्माण होणारा विचारांचा, भावनांचा कल्लोळ स्वाभाविक आहे. मी विचारपूर्वक, योग्य तो वेळ घेऊन हा निर्णय घेत आहे. लेखात सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टींचा सारासार विचार करून ‘अमुक एक गोष्टीत मला आनंद लाभणार आहे, त्याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना मी स्वत: जबाबदार आहे’ हे मनाशी पक्कं करावं. प्रसंगी आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता हे नंतर कळून आल्यास नकारात्मक भावना उफाळून येतील, तेव्हा सतर्क राहावं.. आत्मबळ ढळू देऊ नये. मनुष्याच्या हातून चुका होऊ शकतात. त्यातून जास्तीत जास्त बोध घेण्याचा प्रयत्न करावा. मनापासून प्रामाणिकपणे केलेल्या या प्रयत्नाला आपले जवळचेही साथ देतात असं बऱ्याचदा आढळून आलं आहे.
२) निर्णय कळवताना योग्य वेळ निवडावी- आपण निर्णय कळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत ना, याची खातरजमा न चुकता करावी. त्यामुळे आजूबाजूच्या दबावांचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. परंतु आपल्या विचारकक्षेत न आलेली एखादी बाब निर्णयाची चर्चा करताना आढळून आल्यास तिच्याकडे दुर्लक्ष न करता गरज भासल्यास तिचा समावेश करून मगच निर्णयाकडे वळावं. कधी कधी एखादी अशी गोष्ट जादूई बदल घडवून आणू शकते. त्यामुळे या शक्यतेसाठी आपला आडमुठेपणा दूर ठेवलेला बरा !
३) शब्द आणि देहबोलीची निवड सुयोग्य असावी. संयमी धोरण ठेवून, योग्य त्या शब्दांवर जोर देत आपलं म्हणणं साजेशा देहबोलीच्या आधारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावं. आपलं म्हणणं आणि समोरच्या व्यक्तीची झालेली समजूत यांचा मेळ बसतो आहे की नाही, हे जाणून घ्यावं. समोरच्या व्यक्तीच्या आग्रही भूमिकेमुळे किंवा परिस्थितीमुळे दबावाचं वातावरण निर्माण होत असल्यास आपण विचारांती ठरवलेली भूमिकेची चौकट शक्यतो सोडू नये. आवाज वाढवल्याने किंवा अनुचित शब्दांनी/ देहबोलीने परस्परांची ताटातूट होईल. पण ते टाळावं. समोरच्या व्यक्तीचा उचित मान ठेवून व प्रसंगावधान राखून आपलं म्हणणं मांडावं. तेव्हा विचारपूर्वक सज्ज होऊ या आणि बेधडक कृती करू या!
n ketki.gadre@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2016 1:01 am

Web Title: intensive treatment on human behavior and positive changes
Next Stories
1 मनोविष्कार : अपेक्षांचं ओझं
Just Now!
X