साधनेच्या मार्गावर आपण आलो ते कशासाठी,  साधनेमागचा हेतू काय, या प्रश्नांचा साधकानं अतिशय गांभिर्यानं विचार केलाच पाहिजे. हा हेतूच जर माहित नसला तर कितीही जप करा, कितीही पूजाअर्चा करा, कितीही योगक्रिया साधा.. त्यानं काहीही साधणार नाही. साधना कशासाठी आहे? काय साधायचं आहे आपल्याला साधनेनं? जगणं भौतिकदृष्टय़ा अधिक सुखाचं व्हावं, हा हेतू आहे आपला? मग त्यासाठी अध्यात्म नाही! भौतिक जगणं सुखाचं करण्यासाठी अनंत क्षमतांनी युक्त असा देह लाभला आहे. त्या जोरावर जरूर हवी तेवढी धडपड करा ना! पण मी रोज पूजा करतो, रोज माळ ओढतो म्हणून माझ्या जगण्यातल्या सर्व अडचणी सुटल्याच पाहिजेत, अशी अपेक्षा करणं हा सौदा झाला. तेव्हा साधनेचा एकमेव हेतू म्हणजे जगातलं भ्रामक गुंतणं संपावं, जगाचा प्रभाव संपावा, जगाकडून अपेक्षा करणं संपावं आणि त्याजागी परम तत्त्वाचा प्रभाव रूजावा. जगण्यातला समस्त संकुचितपणा संपावा आणि जगणं व्यापक व्हावं, परिपूर्ण व्हावं. साधनेमागचा, अध्यात्माच्या मार्गावरील वाटचालीमागचा हा मूळ हेतू लक्षात घेऊन त्या हेतूच्या पूर्तीसाठीच प्रयत्न करीत राहणं म्हणजे खऱ्या आत्महितासाठी प्रयत्न करीत राहाणं आहे. समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’चा पुढचा श्लोक त्या आत्महिताचीच महत्ता, त्या आत्महिताचंच भान जागवू पाहात आहे. हा मूळ श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

हिताकारणें बोलणें  सत्य आहे।

हिताकारणें सर्व शोधूनि पाहे।

हिताकारणें बंड पाखांड वारीं।

तुटे वाद संवाद तो हीतकारी।। १११।।

प्रचलित अर्थ : हे मना, तुझ्या हितासाठी तुला खऱ्या गोष्टी सांगतो त्या ध्यानी धर. संशय वाटत असेल तर बोध व विचार करून पाहा. तुला स्वहित साधायचं असेल तर पाखांडवाद पूर्ण सोडून दे आणि वाद मिटेल असा संवाद सुरू कर.

आता मननार्थाकडे वळू. साधना म्हणजे जीवनाचं निश्चित झालेलं ध्येय सतत अंतरंगात जपणं आणि त्या ध्येयानुरूप वाटचाल सुरू राहाणं! थोडक्यात साधना म्हणजे ध्येयाचा ध्यास आहे, ध्येयाचं स्मरण आहे आणि ध्येयासाठीचे प्रयत्न आहेत. जगणं ध्येयकेंद्रितच झालं पाहिजे, हे समर्थ या श्लोकातून बजावत आहेत. बाबा रे, जर या परमहितासाठी म्हणून तू जे काही बोलशील तेवढंच बोलणं सत्य आहे! बाकीचं सारं बोलणं निर्थक आहे, वायफळ आहे! म्हणजे ज्या बोलण्यानं ध्येयाचं स्मरण टिकेल, ध्येयाचं भान टिकेल त्या बोलण्यालाच अर्थ आहे. तेवढंच बोलणं बोल. आता हे बोलणं म्हणजे काही फक्त दुसऱ्याशी बोलणं नव्हे. कारण माणूस वैखरीनं, प्रत्यक्षात जेवढं बोलतो त्यापेक्षा मनातल्या मनात त्याचं बोलणं अखंड सुरू असतं! इथं मनातल्या बोलण्याकडेच सारा रोख आहे. मनात सतत उफाळून येत असलेल्या अनंत कल्पना आणि अनंत विचारांच्या तरंगातून हे बोलणं सुरू असतं. तेव्हा हे जे आंतरिक बोलणं सुरू आहे ते किती वायफळ आहे, याकडे साधकानं लक्ष द्यायला सुरूवात केली पाहिजे. वायफळ, भ्रामक, मोहजन्य कल्पनांमागे वाहावत जाणं थांबलं पाहिजे. त्या कल्पनांचं चिंतन, मनन, स्मरण यात वाया जाणारी मनाची शक्ती वाचवली पाहिजे. जेव्हा आंतरिक बोलण्यातला निर्थकपणा, वायफळपणा कमी होऊ लागेल तसतसं बाह्य़ जगातलं प्रत्यक्षातलं वायफळ, निर्थक, अहंप्रेरित बोलणंही खुंटू लागेल. जे सत्य आहे त्याच्याच स्मरणात आणि उच्चारात आनंद वाटू लागेल.