03 March 2021

News Flash

Love Diaries : जियें तो जियें कैसे, बिन आपके…

क्लिनिकमधून बाहेर पडल्यावर सुमितच्या डोळ्यापुढून त्या गोष्टी जातच नव्हत्या.

Love Diaries : प्रेमकथा

रविवारची संध्याकाळ असल्यामुळं सुमित नेहमीप्रमाणं घरच्या टेरेसवर बसला होता. जानेवारी असल्यामुळं दिवस लवकर कलतो आणि अंधारही पडतो याची जाणीव असल्यामुळं सुमित चहाचा कप घेऊनच टेरेसवर गेला होता. तीन महिन्यांपूर्वीच विश्रांतवाडीमध्ये त्यानं २ बीएचके फ्लॅट विकत घेतला होता. फ्लॅट निवडण्यासाठी तो खूप दिवस शोधाशोध करत होता. पण त्याला हवा तसा फ्लॅट मिळत नव्हता. अखेर एका एजंटमुळं त्याला त्याच्या मनात असलेला फ्लॅट सापडला आणि त्यानं बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन तो घेण्याचा निर्णय घेतला. फ्लॅट फार काही ग्रेट नसला तरी त्याच्या टेरेसवरून लोहगाव विमानतळावरून उडणारी आणि उतरणारी विमानं अगदी स्पष्टपणे दिसायची. वीकेंड्सला तासनतास ही विमानं बघत बसणं एवढंच तो करायचा… टेरेसवर येऊन कोणीही आपल्याला डिस्टर्ब करू नये, याची पुरेशी काळजी तो घ्यायचा. आई-बाबा किंवा लहान बहिण रिंकूही त्याला कधीच डिस्टर्ब करायचे नाहीत.

सकाळी ऑफिसला निघतानाच सुमितनं आज घरी यायला उशीर होईल, असं आईला सांगितलं होतं. औंधमधला फ्लॅट सोडून इकडं राहायला आल्यावर ऑफिसची वेळ गाठण्यासाठी त्याला आधीपेक्षा दीडेएक तास लवकर निघायला लागायचं. विश्रांतवाडी ते हिंजवडी हे अंतर कापायला त्याला दोन तास लागायचे. पण त्याबद्दल त्याला किंचितही फिकीर नव्हती. इतका वेळ प्रवासात घालवायला लागण्याची मानसिक तयारी त्यानं केली होती. आज नेहमीपेक्षा थोडं जास्तच ट्रॅफिक असल्यामुळं त्याला हिंजवडी चौकात यायला दहा मिनिटं उशीरच झाला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर गाडी पार्क करून लिफ्टकडे जातानाच त्याला मानसी भेटली. दोघंही एकमेकांना हाय… हॅलो… करतच लिफ्टकडं निघाले. मानसी आणि सुमित सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखतात… दोघांमध्येही चांगली मैत्री…

“अपॉईंटमेंट घेतलीये हां मी…तुला साडेसहा वाजेपर्यंत डॉक्टरांकडं पोहोचायला हवं” मानसीनं सुमितला सांगितलं.

“नक्की कुठंय क्लिनिक…काही लॅंडमार्क?”

“ब्रेमेन चौकातून विद्यापीठाकडं जातनाच तुला उजव्या बाजूला पंचवटी हाईट्स दिसेल. त्याच बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावर… फक्त वेळेत पोहोच. उशीर करू नको नाहीतर अपॉईंटमेंट चुकायची…”

“जाईन मी वेळेत… थॅंक्यू सो मच मानसी…” बाराव्या मजल्यावर दोघंही लिफ्टमधून बाहेर पडले आणि आपापल्या डिपार्टमेंटकडे गेले.
फ्लिकॉनमधलं सुमितचं हे सहावं वर्ष… दोनच महिन्यांपूर्वी त्याचं दुसऱ्यांदा प्रमोशन झालं होतं. त्याच्या कामाचं स्वरुपही बदलंल होतं. प्रचंड मानसिक दडपणातून जात असल्यामुळं खरंतर सुमितला दुसरं प्रमोशन मिळायला उशीरच झाला होता. सुमितची मानसिक स्थिती काय आहे, हे केवळ मानसी आणि अरूण या दोघांनाच माहिती होतं. अरूण हा सुद्धा सुमितचा जुना मित्र… सुमित लवकरात लवकर नॉर्मल व्हावा, यासाठी दोघेही प्रयत्न करत होते. त्यातूनच मानसीनं सुमितला सायकॅट्रिस्टला दाखवण्याचा सल्ला दिला. दोघांनी खूप समजावून सांगितल्यावर तो शेवट डॉक्टरांकडं जाण्यास तयार झाला आणि मग तिनंच त्याच्यासाठी अपॉईंटमेंटही घेतली.

“पाच वाजलेत… तुला निघायला हवं थोड्या वेळात…” अरूणनं सुमितला अपाईंटमेंटची आठवण करून दिली.

“हो दोन मेल पाठवायचेत… ते पाठवतो आणि निघतोच…”

साडेपाचच्या सुमारास सुमितनं कंपनी सोडली आणि औंधच्या दिशेने वाट धरली. सव्वा सहा वाजताच तो डॉ. भावेंच्या क्लिनिकवर पोहोचला. तिथं रिसेप्शनिस्टनं त्याला दोन मोठे फॉर्म भरायला दिले. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरुपाचे खूप सारे प्रश्न होते. सुमितनं काही निवडक प्रश्न सोडले तर इतर सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिली. फॉर्म भरून दिल्यावर थोड्या वेळानं सुमितला आत बोलावण्यात आलं. उंचंपुरे, गोबऱ्या गालांचे आणि गोरेपान डॉ. भाव्यांनी त्याला वेलकम करत समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं आणि सुमितनं भरून दिलेला फॉर्म बघण्यास सुरुवात केली. फॉर्म बघतानाच त्यांना नेमकं काय घडलं आहे, याचा अंदाज आला. विषय नाजूक होता. त्यामुळं त्यांनी थेट विषयाला हात न घालता वेगळ्या स्वरुपाचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

“काय केलं की बरं वाटतं…” डॉ. भावेंनी प्रश्न विचारला.

“सध्या तरी कशातच मन रमत नाही… काही गोष्टी बघितल्या की खूपच अस्वस्थ व्हायला होतं. विशेषतः ब्रेसलेट, काळ्या रंगाची पर्स, मोठ्या फ्रेमचा गॉगल बघितला की आतून हालल्यासारखं वाटतं. जीव घाबराघुबरा होऊन जातो. रात्री शांत झोपच लागत नाही.” सुमित सांगत होता. सुमितच्या मनावर केवढा मोठा आघात झालाय, याचा अंदाज डॉक्टर भावेंना त्याच्या बोलण्यातून आला होता. त्यामुळं त्यांनी पहिल्याच सीटिंगमध्ये जास्त खोलात न जाण्याचा निर्णय घेतला आणि सुमितला काही गोळ्या देऊन दोन दिवसांनी परत येण्यास सांगितले.

क्लिनिकमधून बाहेर पडल्यावर सुमितच्या डोळ्यापुढून त्या गोष्टी जातच नव्हत्या. त्यानं थेट मानसीला कॉल केला. ती ऑफिसमधून निघाली होती. सुमितनं तिला औंधच्या ‘सीसीडी’मध्ये येण्यास सांगितलं. दोघांनी कॉफीची ऑर्डर दिल्यावर सुमित पुन्हा एकदा भावनाविवश झाला. त्याला परत एकदा सगळं आठवू लागलं आणि अस्वस्थ करू लागलं.

“मुलींना कसं जमतं हे सगळं… एकदम क्लोज येऊनही अलिप्त राहणं… इतक्या पटकन ऑन-ऑफ होणं कसं शक्य होतं… क्षणात भूतकाळ विसरून सगळं सोडून निघून जाणं” सुमितच्या या प्रश्नांची मानसीकडं काहीच उत्तरं नव्हती. पण तिला त्याची परिस्थिती माहिती असल्यामुळं ती फार काही मनाला लावून घेत नव्हती आणि शांतपणे तो काय बोलतोय, हे ऐकत होती. सुमितला शांत करण्याचं आणि झालं गेलं विसरून जाण्यास सांगण्याचं काम मानसी करत होती. पण आधीच्या अनेक प्रयत्नांप्रमाणं हा प्रयत्नही अपयशी ठरला होता. मानसीनं विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण सुमितची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. शेवटी तिनं सुमितला तिच्याच गाडीतून घरी सोडण्याचा निर्णय घेतला. तासाभराच्या प्रवासानंतर दोघे विश्रांतवाडीला पोहोचले. संपूर्ण प्रवासात सुमित एक शब्द बोलला नाही.

घरात गेल्यावर समोर आई-बाबा असल्यामुळं सुमित काहीसा भानावर आला होता. तरी त्याचा कुणाशीही बोलण्याचा मूड नव्हताच. कपडे चेंज करून हात पाय धुतल्यावर तो थेट टेरेसकडेच निघून गेला. समोर विमानांचं उड्डाण/आगमन सुरू होतं. विमानाच्या वेगासोबतच आठवणींचा पट सुमितच्या डोळ्यापुढून झराझरा जात होता. त्याला एकदम नेहाची पहिली भेट आठवली.

……………………………

ज्युनिअर मॅनेजरच्या पोझिशनसाठी नेहानं फ्लिकॉनमध्ये अप्लाय केलं होतं. सुमितनंच तिचा इंटरव्ह्यू घेतला होता. एकदम देखणी पर्सनॅलिटी. शार्प फिचर्स असलेली नेहा पहिल्या भेटीतच सुमितच्या नजरेत भरली होती. तिला बघताक्षणीच सुमितनं तिचं सिलेक्शन करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त औपचारिकता म्हणून त्यानं काही प्रश्न विचारले आणि त्याची तिनं अगदी सहजपणे उत्तरं दिली.
नेहा घरातील एकुलती एक मुलगी. अत्यंत लाडात वाढलेली… पण महत्त्वाकांक्षी… तिला परदेशात जाऊन करिअर करायची खूप इच्छा… चांगली संधी मिळत नव्हती म्हणून ती पुण्यात नोकरीसाठी ट्राय करत होती. यातच तिला फ्लिकॉनमधला जॉब मिळाला आणि

सुमितसारखा बॉसही! कामाच्या निमित्तानं नेहा आणि सुमित हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. वेगवेगळ्या आकाराच्या पर्स नेहाचा वीकपॉईंट! तिच्याकडं वेगवेगळ्या पर्सचं मोठं कलेक्शनचं होतं. त्यातही काळ्या रंगाची पर्स तिची हॉट फेव्हरिट. त्यामुळं सुमितनं कंपनीच्या कामासाठी झालेल्या दोन परदेश दौऱ्यांमधून तिच्यासाठी पर्सही आणल्या होत्या. त्या तिला बेफाम आवडल्याही होत्या.

एकमेकांसोबत शॉपिंगला जाणं, हॉटेलमधलं खाणपिणं…वीकेंडला एकमेकांना वेळं देणं यामुळं सुमित नेहामध्ये पूर्णपणे गुंतला होता. आता फक्त त्यानं तिला औपचारिकपणे प्रपोज करणं आणि तिनं त्याला होकार देणं एवढंच बाकी होतं. सुमित त्यासाठी संधीच्या शोधात होता आणि एक दिवस सकाळी सकाळीच सुमितला नेहाचा फोन आला.

“मला तुझ्याशी बोलायचंय… खूप पर्सनल आहे… कुठं भेटूया” पलीकडून नेहा होती.

“तू सांगशील तिथं यायला मी तयार आहे…”

“‘सर्जा’मध्ये लंचला भेटूया… चालेल…” नेहानं विचारलेल्या प्रश्नाला सुमितनं क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.
दोघेही ठरलेल्या वेळेत ‘सर्जा’मध्ये पोहोचले. नेहानं कार्बन ब्लॅक जीन्स आणि शॉर्ट शर्ट घातला होता. सुमितही जीन्स आणि टीशर्टमध्ये होता. सूपची ऑर्डर दिल्यावर नेहानं बोलायला सुरुवात केली.

“सुमित, डू यो नो… अॅम सो हॅपी टुडे… मी इतकी आनंदात आहे की आता काय करावं काहीच सुचत नाही. खरंच कळत नाहीये. आनंदाचा हा क्षण तुझ्यासोबत साजरा करतानाही मला खूप आनंद होतो आहे.” ही वाक्ये बोलत असतानाच तिनं तिच्या पर्समधून एक एन्व्हलप बाहेर काढलं….एन्व्हलपमध्ये काय असेल, याचा विचार सुमितच्या मनात सुरू झाला. लव्हलेटर तर नसेल, असा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला.

नेहानं एन्व्हलपमधील लेटर काढून ते सुमितच्या हातात दिलं आणि त्याला वाचायला सांगितलं. सुमितनं लेटर उघडताच त्याला धक्काच बसला. इंग्लंडमधील एका नामांकित कंपनीचं ते ऑफरलेटर होतं. नेहाला सिनिअर मॅनेजर पोझिशनवर त्या कंपनीनं ऑफर दिली होती. नोकरीसोबतच भलामोठा पगारही तिला ऑफर करण्यात आला होता.

सुमितनं लेटर पूर्णपणे वाचायच्या आताच ही ऑफर मी स्वीकारली असल्याचं आणि आठ दिवसांतच मी इंग्लंडला जात असल्याचं नेहानं सांगून टाकलं. इतकंच नाहीतर तिकडचं स्थायिक होण्याचा निर्णयही तिनं जाहीर करून टाकला.

फ्लिकॉनमध्ये संधी दिल्याबद्दल नेहानं सुमितचे खूप आभार मानले आणि आजचं बिल मीच देणार हे सांगूनही टाकलं. अमित आतून पुरता हलला होता. पण त्याला काय कराव काहीच सुचत नव्हतं. त्यानं नेहाचं अभिनंदन केलं!

…. आणि अखेर तो दिवस उगवला. लोहगाव एअरपोर्टवर नेहाला सोडण्यासाठी तिच्या कुटुंबियांसोबतच सुमितही गेला होता. नेहानं पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सुमितला थॅंक यू म्हटलं. सगळ्यांच्या निरोप घेत नेहानं चेक इन केलं आणि पुढच्या तासाभरात तिच्या फ्लाईटनं टेकऑफही केलं होतं…
…………………………….

टेरेसमध्ये बसलेल्या सुमितच्या नजरेसमोर एकामागून एक फ्लाईट येत होते आणि जात होते. पलीकडच्या घरामध्ये कुणीतरी गाण लावलं होतं… जियें तो जियें कैसे, बिन आपके… सुमितच्या अश्रूंचा बांध फुटला होता…

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:15 am

Web Title: exclusive marathi love stories interesting stories sad ending love stories in marathi
Next Stories
1 Love Diaries : अॅडिक्शन (भाग २)
2 Love Diaries : अॅडिक्शन
3 Love Diaries : humtumforever2228@gmail.com (भाग २)
Just Now!
X