24 May 2020

News Flash

१५ हजार कोटींच्या कर्जातून ५२ पाटबंधारे प्रकल्प

प्रगतिपथावरील या ५२ पाटबंधारे प्रकल्पांत उर्वरित महाराष्ट्रात सहा मोठे प्रकल्प, १५ लघू, तर सात मध्यम प्रकल्प आहेत

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

जलयुक्त शिवार, शेततळी व विहिरी बांधण्याबरोबरच राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून १५ हजार कोटी रुपये कर्जउभारणीच्या माध्यमातून  तीन वर्षांत ५२ पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचे ‘लक्ष्य’ निश्चित करण्यात आले आहे. या पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर राज्यात २.९० लक्ष हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार असून ८९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सखोल आढावा घेण्यात आला होता. ज्या धरणांची कामे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत त्यांनाच पहिल्या टप्प्यात निधी देऊन ती पूर्ण करणे तसेच आवश्यक त्या कालव्यांची कामे  करणे आणि ज्या धरणांची गळती होत आहे त्यासाठी पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून गळती थांबविण्याला प्राधान्य देण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले होते. तथापि वेगवेगळ्या भागांतील लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाटबंधारे प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

सध्या सुरू असलेल्या धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नव्याने आढावा घेतला. याअंतर्गत राज्यातील ३३४ पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू असून त्यासाठी राज्य शासनाने आठ ते नऊ हजार कोटी रुपये जलसंपदा विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. मात्र लाभक्षेत्र विकास कार्यक्रम, खारभूमी, जलविद्युत प्रकल्प, पूरनियंत्रण आदी कामांसाठी आवश्यक ती तरतूद वजा करता पाटबंधारे प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटी रुपये उपलब्ध होतात. प्रकल्पांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता या निधीतून केवळ वाढीव खर्च केवळ भागवता येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सिंचन क्षमता निश्चित कालावधीत वाढण्यासाठी प्रगतिपथावरील ५२ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना व बळीराज जलसंजीवनी योजना या दोन्ही योजनांत समाविष्ट नसलेल्या व प्रगतिपथावर असलेल्या ५२ प्रकल्पांची निवड करण्यात आली असून तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज घेण्यात येणार असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २.९० दशलक्ष हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार असून ८९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी तीन वर्षांत निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे.

प्रगतिपथावरील या ५२ पाटबंधारे प्रकल्पांत उर्वरित महाराष्ट्रात सहा मोठे प्रकल्प, १५ लघू, तर सात मध्यम प्रकल्प आहेत. मराठवाडय़ात दोन मोठे, तर सहा लघू प्रकल्प, विदर्भात तीन लघू व सात मध्यम प्रकल्प, अमरावती विभागात पाच मोठे व दोन मध्यम प्रकल्प असून हे सर्व प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.

– गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:34 am

Web Title: 15 irrigation projects with a loan of rs15 thousand crores abn 97
Next Stories
1 युतीची घोषणा नवरात्रात?
2 क्षयरोग, कुष्ठरुग्ण सर्वेक्षणाचे काम ठप्प होणार!
3 टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासाची घाई
Just Now!
X