मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाकडून शुक्रवारी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सात जणांना दोषी ठरवण्यात आले. तर अब्दुल कयुम शेख याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १९९३ साली झालेल्या या बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू  झाला होता तर ७१३ जण जखमी झाले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दूल रशिद  खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी , अब्दुल कयुम शेख आणि करीमुल्लाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. त्यामुळे टाडा कोर्टाच्या आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर न्यायालयाकडून टप्प्याटप्प्याने प्रत्येक आरोपीसंदर्भात निकाल देण्यास सुरूवात केली. यावेळी सर्वप्रथम हत्या आणि बॉमस्फोटाचा कट रचल्याचा आरोप सिद्ध झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ताहिर मर्चंट, फिरोज खान, करीमुल्लाह खान , रियाज सिद्दीकी आणि अबू सालेम यांना न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले.

स्फोटासाठी आरडीएक्स मुंबईत घेऊन आलेल्या डोसावर हत्या आणि कटाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मुस्तफा डोसाने दुबईत बसून आपल्या हस्तकांच्या मदतीने भारतात आरडीएक्स या स्फोटकासह मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा धाडला. रायगडच्या दिघी, शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनाऱ्यावर डोसाचा मोठा भाऊ मोहम्मद व साथीदारांनी तो उतरवून घेतला. तर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि कटाच्या गुन्ह्यात अबु सालेम दोषी ठरला आहे. आता सोमवारपासून त्यांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद सुरू होणार आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१५ मध्ये त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती.

१९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपींची ही दुसरी तुकडी होती. या सगळ्यांना २००३ ते २०१० या काळात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पहिला खटला संपत असताना हे सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे खटला चालवण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी संघटित गुन्हेगारी टोळीचा भाग असलेल्या या आरोपींनी बाबरी मशिद पाडल्याचा बदला घेण्याचे ठरवले. त्यानंतर दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांच्या नेतृत्त्वाखाली ३१ जणांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात पहिल्यांदाच एखाद्या दहशतवादी हल्ल्यासाठी इतक्या मोठ्याप्रमाणात आरडीएक्स वापरले गेल्याचे, सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते. दरम्यान, आज न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे सीबीआय याकूब मेमनप्रमाणे मुस्तफा डोसासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करू शकते.