‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेअंतर्गत रसिक प्रेक्षकांनी ‘संगीतबारी’ला दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर शनिवारी शिवाजी मंदिरमधील ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या प्रयोगाला रसिकांनी तुडुंब गर्दी केली. शिवाजी मंदिर या नाटय़गृहाची बाल्कनी या गर्दीमुळे अनेक दिवसांनंतर उघडली गेली. प्रयोगाला विविध क्षेत्रातील मान्यवरही आवर्जून उपस्थित होते.
पत्रकारिता क्षेत्राच्या सद्यस्थितीची सुरुवात जेव्हा झाली, ती या नाटकात पाहायला मिळते. पत्रकारितेचे प्रामाणिक आणि वास्तव चित्रण ‘दोन स्पेशल’च्या आधी कोणत्याही नाटकात पाहायला मिळाले नाही. त्यामुळेच या नाटकाची निवड ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ उपक्रमासाठी झाली, अशी भूमिका ‘लोकसत्ता’चे ‘फीचर एडिटर’ रवींद्र पाथरे यांनी या वेळी मांडली. प्रयोगानंतर रवींद्र पाथरे यांनी नाटकाचे निर्माते संतोष काणेकर, प्रमुख कलाकार जीतेंद्र जोशी, गिरिजा ओक आणि लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांच्याशी संवाद साधला.
ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी १९८१ मध्ये लिहिलेल्या कथेवर आधारित हे नाटक आहे. मराठे यांच्या कथेमध्ये दोन मित्रांच्या संवादातून कथा उलगडून दाखविण्यात आली होती, ती मला भावली, असे क्षितीज पटवर्धन यांनी सांगितले. नाटक लिहिताना असे वाटले की, दोन पुरुष पात्रांऐवजी एक पुरुष व एक स्त्री पात्र घेतले तर यातील गांभीर्य अधिक ठळकपणे समोर येऊ शकेल. त्यामुळे त्या प्रकारे नाटकाची मांडणी केली, असे पटवर्धन म्हणाले.
निर्माते आणि प्रमुख अभिनेते जीतेंद्र जोशी म्हणाले, ‘नाटक ऐकल्यानंतर मी अक्षरश: शहारून गेलो. ते मला खूप भावले. क्षितीजला त्याच्या पद्धतीने हे नाटक करायचे होते. त्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. मी ते देण्याचा निर्णय घेतला’. गिरिजा ओक म्हणाल्या की, नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक जर एकच असेल तर त्याचा चांगला फायदा नाटकाला होतो. नाटकाचे निर्माते संतोष काणेकर यांनी, सध्या वेगवेगळ्या विषयांवरील नाटकांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्षितिजने मला नाटक ऐकविण्याऐवजी त्यातील प्रसंग वर्णन करून सांगितले. तेव्हाच हे नाटक आपण ते करायचेच असे मनाशी ठरविले, असे सांगितले.

१. ‘दोन स्पेशल’ नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी. त्यानिमित्ताने शिवाजी मंदिर नाटय़गृहातील बाल्कनी कित्येक दिवसांनंतर प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली.

२. नाटकानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना निर्माता संतोष काणेकर, ‘लोकसत्ता’चे रवींद्र पाथरे, अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले, निर्माता व अभिनेता जीतेंद्र जोशी, दिग्दर्शक व लेखक क्षितीज पटवर्धन, कलाकार रोहित हळदीकर. (छाया : दिलीप कागडा)

एखादे चांगले नाटक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमामुळे ‘दोन स्पेशल’ हे एक उत्तम नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच चांगली मदत होणार आहे. असे उपक्रम सातत्याने व्हावेत त्यामुळे चांगली नाटके जास्तीत जास्त प्रेक्षकापर्यंत पोहोचतील.
आदिती सारंगधर

नाटक खूप छान आहे. नाटक पाहायचे अगोदरच ठरविले होते. नाटकाबद्दल वृत्तपत्रातून लिहून येते, चर्चा होते तेव्हा सर्वसामान्य वाचक आणि प्रेक्षकांनाही त्याबाबत कळते आणि त्यालाही ती कलाकृती पाहावी असे वाटते. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाची भविष्यात आणखी काही चांगल्या नाटकांना नक्कीच मदत होणार आहे.
उमेश कामत