शैलजा तिवले

करोना दक्षता केंद्रामध्ये सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासितांचे (इंटर्न) विद्यावेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना वाढीव वेतनही जाहीर केले. परंतु पालिकेने अद्याप याची अंमलबजावणी न केल्याने आंतरवासितांना अशा संकटकालीन परिस्थितीतही २०० रुपये प्रतिदिन मानधनावर सेवा द्यावी लागत आहे.

मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू केलेल्या करोना दक्षता केंद्रात (सीसीसी १) पालिकाअंतर्गत असलेल्या शासकीय महाविद्यालयातील आंतरवासितांची नियुक्ती केली आहे. या विद्यार्थ्यांना महिन्याला अवघे सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते, परंतु तेही फेब्रुवारीपासून मिळालेले नाही.

एकीकडे मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टरांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांना १५ दिवसांसाठी ५० हजार रुपये मानधन देत सेवा देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परंतु पालिकेमध्ये सेवा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना अवघ्या सहा हजार रुपये विद्यावेतनावर काम करण्यास पालिकेने भाग पाडले आहे.

करोना दक्षता केंद्रात आम्ही एकही सुट्टी न घेता आठ तास सेवा देत आहोत. आमच्यातील बहुतांश मुलांची घरे मुंबईबाहेर आहेत. सध्या जेवणाचे डबेही सुरू नाहीत. त्यामुळे अनेकदा उपाहारगृहातच जेवण करावे लागते. तोही खर्च परवडणारा नाही, अशी व्यथा या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’कडे मांडली.

राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये आंतरवासितांचे वेतन वाढवून ११ हजार रुपये केल्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीर केले. त्यानंतर राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी झाली. परंतु शासन आदेशाला आठ महिने उलटत आले तरी पालिकेने अद्याप वाढीव वेतन लागू केलेले नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही पालिकेने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे करोना संकटकाळातही रुग्णसेवेला प्राधान्य देणाऱ्या या आंतरवासितांना अवघ्या २०० रुपये मानधनावर समाधान मानावे लागत आहे.

‘पुढील महिन्यात वाढीव वेतन’

प्रणाली बदलल्याने वेतन प्रलंबित आहे. केईएम आणि कूपरमधील विद्यार्थ्यांचे वेतन झाले आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयातील काही विद्यार्थ्यांचे वेतन बाकी आहे तेही दोन दिवसांत देण्यात येईल. पालिकेकडून केंद्रीय निर्णय (सीआर) काढण्याची प्रक्रिया प्रलंबित राहिल्याने वाढीव वेतन लागू झालेले नाही. मार्चमध्ये ही प्रक्रिया होणार होती, परंतु आता करोना संकटामुळे ही कामे रखडली आहेत. पुढील महिन्यात वाढीव वेतनही लागू होईल, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.