३० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्यातून ४६ वर्षांच्या व्यक्तीची अखेर सुटका झाली. अल्पवयीन मुलगा आणि मुलीने सहमतीने शरीरसंबंध ठेवल्याने हा बलात्कार ठरत नाही, असा सांगत न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले.

जानेवारी १९८८मध्ये अंधेरी पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल झाली होती. १७ वर्षांच्या मुलीच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली होती. अपहरण करुन बलात्कार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. मुलीचे आई- वडील कामावर गेले असताना आरोपीने मुलीला फूस लावून घरातून पळवले आणि तिच्यावर बलात्कार केला, असे तक्रारीत म्हटले होते. तब्बल ३० वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु होती. या दरम्यानच्या काळात बलात्काराचा आरोप असलेली व्यक्ती गुजरातमध्ये राहायला गेली. सुनावणीसाठी त्याला वारंवार मुंबईत यावे लागायचे. अखेर या प्रकरणात मुंबईतील जिल्हा सत्र न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय दिला आहे. १६ वर्षांवरील मुलीने तिच्या सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा गुन्हा ठरत नाही. या प्रकरणातही बलात्कार झाल्याचा पुरावा समोर आलेला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त केले.

या प्रकरणातील तरुणीनेही १९८८ मध्ये पोलिसांना जबाब दिला होता. संबंधित मुलासोबत मी स्वेच्छेने गेले होते. सहमतीनेच त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले, असे तिने पोलिसांना सांगितले होते. या आधारे न्यायालयाने हा निर्णय दिला.