केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीच्या नाटय़ संमेलनात जाहीर केलेला पाच कोटी रुपयांचा निधी तब्बल दोन वर्षांनंतर येत्या पावसाळी अधिवेशनात परिषदेच्या हाती पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत आश्वासन दिल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिली. या निधीतून परिषदेच्या अनेक प्रलंबित योजना मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नाटय़ परिषदेच्या नाटय़ प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर यांनी निधीबाबत माहिती दिली. या निधीतील ७५ लाख रुपये कामगारांसाठी कायमस्वरूपी ठेव म्हणून राखून ठेवण्यात येतील. या ठेवीवरील व्याजातून कामगारांच्या मुलांचा शिक्षण खर्च, त्यांच्या कुटुंबियांना लागणारी वैद्यकीय मदत परस्पर दिली जाणार आहे. यामुळे ऐन पावसाळी अधिवेशनात नाटय़ परिषदेवर निधीचा ‘पाऊस’ पडणार आहे.
दरम्यान, नाटय़ क्षेत्राकडे प्रतिभावान तरुण-तरुणींनी आकर्षित व्हावे या हेतूने नाटय़ परिषदेने १५ ते ३० जून या कालावधीत नाटय़ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या १५ दिवसांत सायंकाळी ६ ते १० या वेळेत १० ते २३ या वयोगटातील १०० मुलामुलींना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी ११ ते १३ जून दरम्यान निवड चाचणी घेण्यात येईल. विद्या पटवर्धन यांनी मांडलेल्या संकल्पनेला आम्ही मूर्त रूप देत आहोत, असे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.

प्रवेश कसा घ्याल?
या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीचे अर्ज १ जूनपासून ११ ते ५ या वेळेत यशवंत नाटय़ मंदिराच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध होतील. निवड चाचणीत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीना सहा हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. निवड चाचणीत मुलाखत आणि सादरीकरण या दोन गोष्टींवर भर दिला जाणार आहे. निवडक १०० मुलामुलींना प्रवेश.

मार्गदर्शक कोण कोण?
रत्नाकर मतकरी, सचिन खेडेकर, मोहन जोशी, राजन ताम्हाणे, प्रदीप मुळ्ये, सुकन्या कुलकर्णी, अशोक पत्की, ऋषिकेश जोशी, अतुल परचुरे, संभाजी भगत, राहुल भंडारे, विजय पाध्ये, सोनिया परचुरे,
संतोष वेरूळकर.