25 November 2017

News Flash

मुंबईत ५००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा मार्ग मोकळा

मुंबईतील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी लंडनच्या धर्तीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सरकारच्या योजनेनुसार शहरात लवकरच

संजय बापट,मुंबई | Updated: February 23, 2013 5:39 AM

मुंबईतील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी लंडनच्या धर्तीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सरकारच्या योजनेनुसार शहरात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात सुमारे पाच हजार कॅमेरे बसविण्याचे काम साई इलेक्ट्रॉनिक या कपंनीला देण्यात आले असून त्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पुण्यात कॅमेरे बसविण्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत.
मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील गर्दीची ठिकाणे, महत्त्वाची कार्यालये, चौक, रेल्वे स्टेशन, बस स्थानकांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसविण्याची चर्चा सरकार दरबारी सुरू झाली. त्यानुसार एका स्वयंसेवी संस्थेने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्तावही सरकारला दिला. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पोलिसानी उपस्थित केल्यानंतर सरकारच्याच माध्यमातून शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याची चर्चा सुरू झाली. मात्र याच दरम्यान १३ जुलै २०११ रोजी शहरात झालेल्या साखळी बाँबस्फोटानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. त्यानुसार लंडनच्या धर्तीवर शहरात सुमारे पाच ते सहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारून त्याच्या माध्यमातून दहशतवादी किंवा विघातक शक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची योजना गृह विभागाने आखली. त्यानंतर हे काम गतीने व्हावे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सचिवांची एक समिती स्थापन करण्यात आली आणि सीसीटीव्ही बसविण्याबाबतचे सर्व अधिकार या समितीला देण्यात आले.
 यासाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून शहरात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम बंगळुरुच्या साई इलेक्टॉनिक्स या कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी ६३६ कोटी रुपये  खर्च येणार असून कामाचे कार्यादेशही देण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनी दिली. हे काम करण्यासाठी काही परदेशी कंपन्याही इच्छूक होत्या. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गोळा होणारी माहिती आणि देशाची सुरक्षितता यांचा विचार करून हे काम देशी कंपनीलाच देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम करताना सुरक्षा यंत्रणांचीही मान्यता कंपनीला घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातही अशाचप्रकारे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी तीन निविदा आल्या आहेत. लवकरच त्यावर निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक १५ गस्ती नौका
मुंबईची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने २४० कोटींचा निधी दिला असून त्यातून अत्याधुनिक अशा १५ गस्ती नौका लवकरच तटरक्षक दलात सामील होणार आहेत. वेगवान आणि किनाऱ्याच्या जवळून जाऊ शकणारी तसेच रात्रीही शत्रूच्या हालचाली टिपू शकणारी अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या पहिल्या नौकेचे जलावतरण मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अशाच प्रकारच्या आणखी १४ नौका तटरक्षक दलात सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on February 23, 2013 5:39 am

Web Title: 5000 cc tv camera installation way opened in mumbai