अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या यादीनंतर सुमारे ६० जागा रिक्त राहिल्याने ज्या७ विद्यार्थ्यांना अद्याप कुठेच प्रवेश मिळू शकलेला नाही त्यांना पुढच्या आठवडय़ात संस्था स्तरावर प्रवेश घेण्याची संधी असणार आहे.
अकरावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून १,९७,२८७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. अकरावीच्या १,५३,४७८ जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस होती. त्यानंतर अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटय़ामधून १४,११३ हजार जागांची भर पडून एकूण जागांची संख्या १,६७,५९१ इतकी झाली. यापैकी ६० हजार जागा अजुनही रिक्त असून त्या करिता पुढील आठवडय़ात संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविल जाईल, असे शिक्षण उपसंचालक एन. बी. चव्हाण यांनी सांगितले.
कोणत्या महाविद्यालयात नेमक्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती ९ किंवा १० जुलैला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर या जागांसाठी संस्थास्तरावर राबविण्याच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांना त्यानुसार अर्ज करून प्रवेश घ्यायचा आहे. हे प्रवेश संस्थास्तरावर केले जाणार असले तरी गुणवत्तेनुसार करायचे आहेत. महाविद्यालयांनी आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जामधून गुणवत्तेनुसार यादी जाहीर करून प्रवेश करायचे आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून मनाजोग्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यात यश आले आहे. मात्र, अकरावीच्या ५ जुलैला जाहीर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या यादीनंतरही २४६ विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. या किंवा तांत्रिक कारणामुळे प्रवेशाची संधी हुकलेल्या तसेच जे ऑनलाईनमधून मिळालेल्या जागेविषयी समाधानी नाहीत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करून प्रवेश घेता येतील.