कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो -३’ मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या विसाव्या टप्प्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. ‘कृष्णा २’ हे टनेल बोअिरग मशीन (टीबीएम) नया नगर ते धारावी स्थानक या दरम्यानचे भुयारीकरण पूर्ण करून धारावी स्थानकाजवळ शनिवारी बाहेर आले. ‘मेट्रो ३’च्या चौथ्या पॅकेजमधील चौथा टप्पा त्यामुळे पूर्ण झाला. कृष्णा २ या टीबीएम यंत्राने १३० दिवसांत ५९० मीटर भुयारीकरणाचे काम पूर्ण केले. विसाव्या टप्प्याच्या या भुयारीकरणामुळे मेट्रो ३ च्या एकूण मार्गिकेपैकी ३५.८ किमी म्हणजेच ६५ टक्के काम पूर्ण झाले.

संपूर्णपणे जमिनीखालून धावणाऱ्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर एकूण २७ थांबे असणार आहेत. भुयारीकरणासाठी सध्या १७ टीबीएम यंत्रे कार्यरत आहेत. टीबीएम यंत्रे उतरवण्यासाठी मार्गिकेवरील आठ ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) खोदण्यात आले आहेत.