विरोधकांचा आरोप; विधानसभेत पडसाद

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाच्या परिसरात १२ हजार झोपडय़ा असताना, त्यांतील फक्त ९३ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचा राज्य सरकारने घाट घातला आहे, अशी टीका विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते नसीम खान यांनी केली.

विमानतळ परिसरातील सर्वच्या सर्व १२ हजार झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करावे, अन्यथा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत दिला.  विमानतळ परिसरात क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, सेवकनगर, विजयनगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झोडपट्टय़ा आहेत. त्यांतील झोपडीधारकांची संख्या जवळपास १२ हजार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव झोपडय़ा हटवून त्यांतील रहिवाशांचे जवळच पुनर्वसन करण्याचा आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुसार २००९ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

त्यात पात्र आढळलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी एचडीआयएल, कमानी येथे १७ हजार घरे बांधण्यात आली. परंतु झोपडीधारकांचे स्थलांतर झालेच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ती घरे पडून आहेत, अशी माहिती नसीम खान यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे विधानसभेत दिली.  सर्वच्या सर्व १२ हजार झोपडपट्टीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.