सध्या अनेक तरुणांना टिकटॉकचं व्यसन लागलं आहे. वेगवेगळी गाणी, डायलॉग यांच्यावर व्हिडीओ शूट करुन ते अपलोड करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं असून त्यावर मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि लाइक्सचं हे व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. असंच व्यसन लागलेल्या 15 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आजीने टिकटॉक व्हिडीओला विरोध केल्याने मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं. दादरमधील भोईवाडा परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला टिकटॉक अॅपचं व्यसन लागलं होतं. नेहमी ते वेगवेगळे व्हिडीओ शूट करुन अॅपवर अपलोड करायची. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड करत असताना आजीने तिला रोखलं. याचा राग मनात धरत मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मुलीने बाथरुममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

मुलगी भोईवाड्यात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 11 जानेवारी रोजी तिच्या वडिलांचा वाढदिवस होता. यावेळी तिने मोबाइलवर व्हिडीओ शूट केलेला पाहून आजी ओरडली आणि व्हिडीओ टाकण्यास विरोध केला. यानंतर तिने बाथरुममध्ये जाऊन गळफास घेतला. बराच वेळ मुलगी बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी आवाज दिला असता काहीच उत्तर आलं नाही. दरवाजा तोडून पाहिलं असता मुलीने गळफास घेतला असल्याचं दिसलं. यानंतर कुटुंबीयांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला.