अंधेरी येथे एका भरधाव वाहनाने कर्तव्य बजावत असलेल्या महिला वाहतूक हवालदाराला धडक दिली. या धडकेत महिला वाहतूक पोलीस प्रतीक्षा सावंत (२३) यांना किरकोळ दुखापत झाली. भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या अवनी गणात्रा (४५) हिला पोलिसांनी अटक केली.
अंधेरीच्या जिवा महाले चौकात विमानतळ वाहतूक पोलीस विभागातील महिला पोलीस प्रतीक्षा सावंत कर्तव्यावर होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या गाडीने सावंत यांना धडक दिली. त्यांना त्वरित संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले. पोलिसांनी भरधाव वेगाने चालविणाऱ्या गणात्रा हिला अटक केली. नंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आल्याची माहिती विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक धात्रक यांनी दिली.