कमला मिल परिसरातील आग दुर्घटनेनंतर सहा बडय़ा हॉटेल्सना टाळे

कमला मिलमध्ये ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो’ या दोन हॉटेलला गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या  पालिकेने नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शनिवारी मुंबईमधील तब्बल ६२४ हॉटेलची पाहणी केली. यापैकी तब्बल ३१४ हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला. तर पालिकेचे सर्व नियम पायदळी तुडविणाऱ्या सहा हॉटेल्सना तसेच एका हॉटेलच्या तब्बल नऊ हजार चौरस फुटांच्या गच्चीला टाळे ठोकण्यात आले. या कारवाई दरम्यान पालिकेने तब्बल ४१७ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त केले. मुंबईतील सर्व हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्सनी अग्निसुरक्षेसह सर्व बाबींची तपासणी करावी आणि नियमांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने करुन घ्याव्यात अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे आदेश पालिका प्रशासनाने शनिवारी दिले.

पालिका अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांकडे काणाडोळा केल्यामुळे कमला मिलमधील दोन हॉटेल्सना भीषण आग लागली आणि त्यात १४ जणांचे बळी गेले. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. मुंबईमधील अनधिकृत बांधकामांविरोधात नगरसेवकांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. नववर्षांच्या जल्लोषानिमित्त मुंबईमधील अनेक हॉटेल, रेस्तराँ आणि पबमध्ये पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते. या पाटर्य़ामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी संपूर्ण दिवसभरात मुंबईतील सर्व हॉटेल्सची पाहणी करुन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हॉटेल्सची पाहणी करण्यासाठी तीन पथके स्थापन केली आणि शनिवारी सकाळपासून मुंबईतील हॉटेलमधील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम सुरू झाली. हॉटेल्सवर सुरू असलेल्या या कारवाईच्या वेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड उपस्थित होते.

झाले काय?

पालिकेने शनिवारी दिवसभरात मुंबईतील तब्बल ६२४ हॉटेल्सची पाहणी केली.  ३१४ हॉटेल्समध्ये आढळलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकामेही तोडली गेली. तसेच नियम धाब्यावर बसवून केलेले अंतर्गत फेरबदलही  तोडून टाकण्यात आले. त्याचबरोबर मरिन ड्राईव्ह येथील कॅथॉलिक जिमखाना, पारशी जिमखाना, विल्सन जिमखाना, इस्लाम जिमखान्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिकेने हातोडा चालविला. कमला मिल, रघुवंशी मिल, एट्रीया मॉल, एव्हरशाईन मॉलमधील हॉटेल्समध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यात आली.

यांचे अनधिकृत बांधकाम पाडले

खैबर, जाफरान हॉटेल्स, बरिस्ता, शालीमार, नित्यानंद, से चीज, रिव्हायवल, साहिल, डॉमिनोज पिझ्झा, फासोस, कैलास लस्सी, अयप्पा इडली सेंटर, केरळा हॉटेल, जंक यार्ड, केएफसी मॉल, यू टर्न, रेडियो बार, ओन्ली पराठा, पेनीनसुला हॉटेल, हॉटेल बावा, हॉटेल ओझोन, पिकासो.