डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, रेतीबंदर भागात बेकायदा बांधकामे करणाऱ्या अकरा जणांच्या विरोधात प्रभाग अधिकाऱ्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी माजी नगरसेवक रमेश पद्माकर म्हात्रे यांचाही समावेश आहे.
मोठागाव, रेतीबंदर भागात महापालिकेची परवानगी न घेता मोठय़ा प्रमाणात चाळी, इमारती उभारण्यात आल्या आहेत. यासंबंधीच्या तक्रारी प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अनधिकृत बांधकामे करणाऱ्या अकरा जणांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी नगरसेवक रमेश पद्माकर म्हात्रे, दत्तात्रय म्हात्रे, सुमन म्हात्रे, मोतीराम म्हात्रे, नितीन म्हात्रे, केतन भोईर, कृष्णा पाटील, गोविंद जोशी, भगवान गायकवाड, चंदन म्हात्रे यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध डोंबिवली पश्चिमेत पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.