खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचे निधन झाले आहे. ८० आणि ९० च्या दशकात अनेक चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या होत्या. ते ५७ वर्षांचे होते. शनिवारी संध्याकाळी यारी रोडवरील फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत सापडले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे.

गोविंदाच्या रंगीला राजा चित्रपटात महेश आनंद यांनी अखेरची भूमिका केली. शेहनशहा (१९८८), मजबूर(१९८९), स्वर्ग (१९९०), थानेदार (१९९०), विश्वात्मा (१९९२), गुमराह (१९९३), खुद्दार (१९९४), बेताज बादशाह (१९९४), विजेता (१९९६) आणि कुरुक्षेत्र (२०००) या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.

मुंबईत वर्सोवा यारी रोडवरील फ्लॅटमध्ये महेश आनंद एकटे रहायचे. पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती. ज्यावेळी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा आपल्याला महेश आनंद यांच्या मृत्यूबद्दल माहिती नाही असे तिने सांगितले. २००२ पासून आम्ही संपर्कात नव्हतो असे तिने सांगितले.

रंगीला राजा हा त्यांचा गेल्या १८ वर्षातील पहिला चित्रपट होता. माझा फक्त सहा मिनिटांचा रोल आहे. पण काम करायला मिळाले याचा आनंद आहे असे त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

चित्रपटांपासून लांब असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असे त्यांनी सिनेस्तानला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. १८ वर्षात कोणीही मला चित्रपटात काम दिले नाही. पण देव माणसाच्या रुपात आला व त्याने मला छोटीशी भूमिका दिली. मी गेली १८ वर्ष एकटा रहात आहे. माझ्याकडे पैसा नाही, काम नाही असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते.

निर्माते पहलाज निहलानी यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले तेव्हा तिथे जाण्यासाठी माझ्याकडे साधे रिक्षाचेही पैसे नव्हते. मी काही मोठया लोकांसोबत काम केले पण त्यांनी मला लक्षात ठेवले नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती.