निकालानंतर वेध लागतात ते प्रवेशाचे. सध्या मुंबईतही अकरावीपासून पदव्युत्तर प्रवेशाची गडबड सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे प्रवेश प्रक्रिया सहजसुलभ होते, असे जरी म्हटले जात असले तरी ते खरे नाही. कारण, सतराशे साठ अभ्यासक्रम, मुंबईला लागून असलेल्या ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार भागातून विद्यार्थ्यांची शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी असलेली धडपड यामुळे प्रवेशाचे त्रांगडे काही सुटायला तयार नाही. त्यातच यंदा सीबीएसई, एसएससी-एचएससीचा एकूण निकाल घसरल्याचे दिसते आहे. प्रत्यक्षात निकालाचा गुणात्मक टक्का वाढलेला दिसतो. थोडक्यात यंदाही काही नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशाचा कटऑफ ९०टक्क्य़ांच्या खाली येणे कठीण आहे.
दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर अकरावी किंवा पदवीच्या पुरेशा जागा उपलब्ध आहेत की नाहीत या चर्चेला वाट फुटते. खरेतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावी, पारंपरिक व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमाच्या जागा पाहता हे प्रमाण कधीच व्यस्त नसते. सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यापुरत्या जागा नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे, प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर रिक्त जागांच्या बातम्याही तितक्याच ठळकपणे लक्ष वेधून घेतात. खरा प्रश्न असतो तो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो की नाही त्याचा. कारण, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच बहुतांश अभ्यासक्रमांचे प्रवेश ठरत असतात. त्यातही व्यवस्थापन कोटय़ातील जागांचे प्रवेश हे संस्था स्तरावर केले जातात. कमी गुण पडल्यास या कोटय़ातून प्रवेशाची वाट सापडतेच. अर्थात त्या करिता पालकांचा खिसा पुरेसा गरम असावा लागतो. हा अपवाद वगळता अकरावी, पदवी प्रवेशाकरिता ऑनलाईन प्रवेशाची वाटच बहुतांश विद्यार्थ्यांना चोखाळावी लागते आणि त्यात गुणवत्ता हाच पहिला निकष असतो.
यंदा राज्याच्या बरोबरीने मुंबईचा बारावीचा निकालही घसरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विभागीय मंडळाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घसरुन यंदा ८६.०८ टक्के इतका लागला आहे. बारावीनंतर कला किंवा विज्ञान शाखेपेक्षा खरी चढाओढ असते ती वाणिज्य शाखेच्या प्रवेशाकरिता. त्यातही या शाखेतील काही ठराविक महाविद्यालयांमधील स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या अगदी मोजक्या उपलब्ध जागांवर बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रवेशाकडे कल अधिक आहे.
आकडय़ात बोलायचे तर मुंबई विभागीय मंडळातून यंदा दोन लाख ९९ हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापकी एकूण दोन लाख ५७ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे ७० हजार ८२५ विद्यार्थी, कला शाखेचे ३७ हजार ३७८, वाणिज्य शाखेचे एक लाख ४५ हजार १६७ आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून चार हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचे त्रांगडे
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येशी मुंबई विद्यापीठात उपलब्ध जागांच्या गणिताचा ताळमेळ घातला असता विज्ञान शाखेसाठी ६१ हजार २० जागा उपलब्ध आहेत. मात्र विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य देत असल्यामुळे या जागा बीएस्सीसाठीच्या पुरेशा ठरणार आहेत. मात्र यंदा ‘नीट’च्या घोळामुळे सुरुवातीला पारंपरिक पदवीला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला कदाचित चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. मात्र अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
वाणिज्यसाठी कसरत
कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ८४१ जागा उपलब्ध असल्यामुळे कला शाखेतील पदवीधरांना प्रवेशासाठी फार धडपड करावी लागणार नाही. मात्र वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या शाखेतून मुंबई विभागातून एक लाख ४५ हजार १६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांना समावून घेण्यासाठी विद्यापीठाकडे एक लाख ३९ हजार ७३० जागाच उपलब्ध आहेत. यामुळे या शाखेतील प्रवेशासाठी चांगलेचच ‘अर्थकारण’ होण्याची शक्यता असून विद्यापीठाने १५ जूनपर्यंत काही जागा वाढवून दिल्या तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकणार आहे.
विद्यापीठाचे ‘ऑनलाईन’ प्रवेश लांबले
मुंबई विद्यापीठाने यंदाही ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली आहे. मात्र ती नोंदणी ज्या संकेतस्थळावर केली जाणार आहे ते अद्याप अद्ययावत झाले नसल्याने ती प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामध्ये मिळालेल्या नोंदणी क्रमांकाची नोंद महाविद्यालयांचे अर्ज भरताना करावी लागणार आहे. मुंबईतील सर्व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही महाविद्यालयांचे प्रवेश ऑनलाइन तर काहींचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठाने यावर्षी बीए, बीकॉम, बीएमएस, बीएसडब्लू, बीएस्सी आयटी, बीएस्सी नॉटिकल सायन्स, बीएस्सी गृहविज्ञान, बीएस्सी एव्हिएशन, बीएस्सी फॉरेन्सिक सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बीकॉम, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम अकाऊंट्स अँड फायनान्स, बीकॉम फायनान्स अँड मॅनेजमेंट आणि बीएमएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व नोंदणी सक्तिची केली आहे.
अकरावीच्या नामांकित महाविद्यालयांसाठी चढाओढ
दहावीच्या निकालात मुंबई विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरुन ९१.९० टक्क्यांवर आला आहे. मुंबई विभागातून यंदा दोन लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि रायगड येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर १,१९,३६५ जागा उपलब्ध आहेत. या अर्थात अनेक विद्यार्थी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांकडेही वळत असल्याने या जागाही पुरेशाच ठरतील. मात्र, यंदा सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच्या निकालातील विद्यार्थ्यांची वाढलेली टक्केवारी राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना आव्हान देणारी ठरेल. त्यामुळे यंदाही काही नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशाचा कटऑफ ९०टक्क्य़ांच्या खाली येणे कठीण आहे. अशा वेळेस काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची तिसरी कटऑफ यादीही लागत नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतच बहुतांश प्रवेश निश्चित होऊन जातात. प्रवेशाच्या प्रतिक्षेत पुढल्या याद्यांकडे अपेक्षेने पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा यामुळे हिरमोढ होणे अपेक्षित आहे. अशा वेळेस दुसरीकडे चित्र काय दिसते तर अनेक महाविद्यालयांमध्ये तीन-चार प्रवेश याद्या लावूनही विद्यार्थी फिरकत नाही. कारण ही महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरणारी नसतात. थोडक्यात प्रवेशाचे हे त्रांगडे यंदाही कायम राहणार आहे.

अकरावीच्या उपलब्ध जागा
इनहाऊस   अल्पसंख्याक   व्यवस्थापन     ऑनलाईन
३५३९९          ७०५१८           १३४४८        १४९८०८
एकूण २६९१७२

अकरावीच्या शाखानिहाय जागा
कला ३४०६९
वाणिज्य १५३६७२
विज्ञान ८१४३१

नीरज पंडित