News Flash

सांभाळ न करता आल्याने दत्तक प्राण्यांची रुग्णालयात रवानगी

अनाथ प्राण्यांच्या संगोपनाचे काम गेली कित्येक वर्षे परळ येथील ‘बलघोडा’ प्रशासन करीत आहे.

सांभाळ न करता आल्याने दत्तक प्राण्यांची रुग्णालयात रवानगी

परळच्या बाई साकरबाई दिनशॉ पेटीट रुग्णालयामधील दत्तकप्राणी योजनेला प्राणिप्रेमींचा प्रतिसाद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राणि दत्तक घेण्याच्या योजनेत केवळ श्वानांनाच दत्तक घेण्याकडे नागरिकांचा कल असून इतर प्राण्यांविषयी मात्र अनास्था असल्याचे सूत्रांनी सांगितले. योग्यरीत्या सांभाळ न करता आल्याने अनेक दत्तक प्राण्यांची रवानगी रुग्णालयात केली जात असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

पाळीव प्राणी आजारी पडल्यास आणि त्यावर होणारा खर्च वाढल्यास अनेक जण श्वानांसह पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडून देतात. अशाच जखमी वा आजारी अवस्थेत सोडलेल्या अनाथ प्राण्यांच्या संगोपनाचे काम गेली कित्येक वर्षे परळ येथील ‘बलघोडा’ प्रशासन करीत आहे. बऱ्याचदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या प्राण्याला सोडून त्यांचे पालक निघून जातात. त्यांनी खोटी माहिती दिली असल्याने संपर्कही होऊ शकत नाही, असे रुग्णलयातील कर्मचारी सांगतात. यामुळे मागील काही वर्षांत रुग्णालयातील कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, गेल्या चार वर्षांपासून रुग्णालय प्रशासनाने नियोजनात्मक पद्धतीने दत्तक प्राणी योजनेला सुरुवात केली होती. मात्र या योजनेकडे प्राणीप्रेमींनी पाठ फिरविल्याने रुग्णलयाचा हा उपक्रम तितकासा यशस्वी झालेला नसल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले आहे.

या योजनेअंतर्गत नि:शुल्क पद्धतीने प्राण्यांची मालकी पालकांना सोपविली जाते. श्वान, मांजर यांच्यासारख्या पाळीव प्राण्यांबरोबरच बल, गाय-वासरू, घोडा या प्राण्यांचादेखील दत्तक योजनेमध्ये समावेश करून घेण्यात आला आहे. दत्तक घेतलेल्या प्राण्यांची मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता दत्तक श्वानांची संख्या यामध्ये अधिक आहे.

शिवाय २०१४ ते २०१७ या कालावधीत दत्तक प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत असले तरी, या प्राण्यांमधील ५० ते ४० टक्के प्राण्यांची घरवापसी होत असल्याची माहिती बैलघोडा रुग्णालयाचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिली.

प्राण्याला पालकांकडील वातावरण न आवडल्यास अथवा त्याचे नीट पालनपोषण न झाल्यास प्राणी आजारी तरी पडतो किंवा निपचिप राहतो. अशा वेळेस पालक दत्तक प्राण्याला पुन्हा रुग्णालयात सोडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांपेक्षा प्रजननित श्वानांना दत्तक घेण्याकडे पालकांचा कल आहे. तसेच पाच ते सहा वर्षांच्या पूर्ण वाढलेल्या श्वानांपेक्षाही त्यांची पिल्ले दत्तक घेण्याकडे अनेकांचा ओढा आहे. श्वानाची प्रजातीही दत्तक योजनेला बाधक ठरत असून, ‘पग’आणि ‘जर्मन शेफर्ड’सारख्या प्रजातींचे श्वान रुग्णालयात उपलब्ध असल्यास त्यांना दत्तक घेतले जात असल्याची माहिती खन्ना यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2017 2:25 am

Web Title: adoptive animal shifted to hospital
Next Stories
1 म्हाडाकडून तीन वर्षांत १२ हजार घरे!
2 गॅलऱ्यांचा फेरा : शून्य-अर्थाची धडपड सारी..
3 ८० टक्के गिरणी कामगारांकडून घरांची विक्री!
Just Now!
X