काँग्रेस खासदार – आमदारांच्या दबावावरून सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची बदली करण्यात आली असतानाच, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणे चुकीचे असून, चौकशीत निर्दोष आढळल्यास ढोबळे यांची त्याच जागी पुन्हा नियुक्ती करावी, अशा शब्दांत ढोबळे यांची पाठराखण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि काँग्रेसची  आज चांगलीच कोंडी केली.
ढोबळे यांच्या बदलीवरून सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना, मनसेने या बदलीला विरोध केला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ढोबळे यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्याने काँग्रेसची पार पंचाईत झाली आहे. चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी म्हणून ढोबळे यांची बदली करण्यात आल्याचे कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. शेवटी मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य करावाच लागतो. पण चौकशीत काही निष्पन्न झाले नाही तर ढोबळे यांची पुन्हा त्याच जागी नेमणूक करण्याची मागणी करून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना पेचात पकडले आहे. फेरीवाल्याचा मृत्यू हा मेंदूतील रक्तस्त्रावामुळे झाल्याचे निदान करण्यात आले आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता चौकशी लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या नाशिकच्या माजी जिल्हाप्रमुखासह अनेक कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या उपस्थितीतत राष्ट्रवादी प्रवेश झाल्याने तो शिवसेनेला झटका मानला जात असला तरी याच वेळी अजितदादांनी शिवसेनेची बाजूही घेतली. पाकिस्तानी हॉकीपटूंच्या विरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचे अजितदादांनी अप्रत्यक्षपणे समर्थनच केले. ते म्हणाले, सीमेवर दोन भारतीय जवानांची क्रूर पद्धतीने पाकिस्तानी सैनिकांनी हत्या केली. त्याबद्दल समस्त भारतीयांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्याची प्रतिक्रिया या आंदोलनातून उमटली, असे त्यांनी सांगितले. पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी नगरच्या राष्ट्रवादी नगरसेविकेच्या मुलाला अटक झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता अजित पवार यांनी, कोणताही राजकीय पक्ष अशा गोष्टी खपवून घेणार नाही. चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास त्या नगरसेविकेच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.