दादर पश्चिमेकडील गजबजलेला परिसर. ऐन संध्याकाळची वेळ . पावसाने आधीच वाहतूक मंदावली होती. त्यातच एक तरूण रस्त्यावर आडवा होऊन झोपला आणि त्याने एशियाड बस अडवून धरली. तब्बल पंचवीस मिनिटे हा प्रकार सुरू होता. यामुळे दादरपासून थेट वांद्रय़ापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला.
उपनगरात राहणाऱ्या या तरुणाचे घरच्यांशी भांडण झाले होते. त्या तिरमिरीत तो संध्याकाळी नाशिकला जाण्यासाठी निघाला होता. दादर (प.) येथील म्हात्रे पेन्स येथून सुटणाऱ्या एशियाडमध्ये तो चढला. त्याने भरपूर मद्यपान केले होते. त्यामुळे बसवाहकाने त्याला बसमध्ये घेण्यास नकार दिला. पण तो हट्टाला पेटला. माझ्याकडे पैसे आहेत, मी तिकीट काढणार आहे, मग मला बसमध्ये का घेत नाही, असे विचारत तो वाद घालू लागला. पण वाहकाने अखेर त्याल खाली उतरण्यास भाग पाडले. त्यामुळे संतापलेला विवेक रस्त्यातच बसच्या समोर आडवा झाला. बस माझ्या अंगावर घाला, असे तो सांगू लागला. यामुळे एशियाड रस्त्यातच थांबली आणि पाठोपाठ इतर वाहने सुद्धा रखडली. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हा हंगामा सुरू होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दादर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याने मद्यपान केले होते. इतर महिला प्रवाशांना त्याचा त्रास झाला असता म्हणून त्याला उतरवल्याचे एसटीचे नियंत्रक नाईक यांनी सांगितले. तर त्याच्या आईला बोलावून समज देऊन नंतर त्याला सोडून दिल्याचे दादर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अलदर यांनी सांगितले.