मोबाइल कॅमेरा असणारी प्रत्येक भारतीय व्यक्ती माझा एजंट असल्याचं महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. लोकसत्ताच्या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या कार्यक्रमात आनंद महिंद्रा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तरं दिली. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ही मुलाखत घेतली. महाराष्ट्राशी असणारं नातं, महाराष्ट्रासमोरील असणारी उद्योग आव्हानं, ट्विटरचा वापर यासहित आपल्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या.

मी ट्विटर का वापरतो आणि इतका अॅक्टिव का असतो असा प्रश्न मला बऱ्याचदा विचारण्यात येतो असं महिंद्रा म्हणाले. या ट्विटरच्या वापराचं कारण उलगडताना आनंद महिंद्रा यांनी एक किस्सा सांगितला. “गुवाहाटीतील एका व्यक्तीने मला फोटो पाठवत पाण्याच्या बाटलीवरील खरी किंमत खोढून चुकीची किंमत लिहिली असल्याची तक्रार ट्विटरवर केली. मी तात्काळ तेथील संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला. खोलात जाऊन पाहिलं असता ही तक्रार खरी असल्याचं लक्षात आलं. आम्ही तात्काळ संबंधित फ्रॅचाईजीवर कारवाई केली,” अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी दिली. त्यामुळे आमचं काय चुकतंय, आम्ही काय सुधारणा करायला हव्यात हे सांगणारी मोबाइल कॅमेरा असणारी प्रत्येक व्यक्ती माझी एजंट असल्याचं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं.

आपण एकाकी आहोत म्हणून वेळ घालवण्यासाठी किंवा मित्रमंडळी नसल्यानं त्यांच्या शोधासाठी ट्विटरवर नसून व्यवसायासाठी, ग्राहकांना चांगली सेवा देता यावी या उद्देशानं ट्विटर वापरत असल्याचं महिंद्रा म्हणाले.

उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं असलेलं महत्त्व सांगताना त्यांनी महाराष्ट्राची तुलना दुसऱ्या एखाद्या राज्याशी नाही तर जगातल्या देशांशी केली. महाराष्ट्रातील तुलना बिहार किंवा इतर राज्यांशी नाही तर जगाशी होते असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. महाराष्ट्र पायाभूत सुविधा, कुशल कामगार, धोरणं अशा अनेक गोष्टींमध्ये आघाडीवर असल्याचं कौतुक त्यांनी केलं. मनोरंजन हे क्षेत्र अत्यंत आकर्षक असून यामध्ये भारताला प्रचंड संधी असल्याचं व या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो असं मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.