‘ओम’च्या जपामुळे आई आणि मुलामध्ये झालेल्या भांडणात फॅशन डिझायनर असलेल्या आईचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीत घडली. सुनीता सिंग (वय ४५) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तिचा मुलगा लक्ष्य (वय २३) यास अटक केली आहे. सदोष मनुष्यवधाचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अंधेरीतील लोखंडवाला संकुलात सुनीता, त्यांचा मुलगा लक्ष्य आणि त्याची प्रेयसी आशाप्रिया बॅनर्जी हे तिघे एकत्र राहत होते. सुनीता यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सुनीता यांना वाईट स्वप्न पडायचे. यामुळे त्या घाबरल्या होत्या. यासाठी त्या एका बाबाकडे गेल्या होत्या. त्या बाबाने सुनीता यांना दररोज रात्री झोपण्यापूर्वी ‘ओम’ असा जप करायला सांगितले होते. सुनीता यांच्या मंत्रोच्चारामुळे लक्ष्य आणि त्याच्या प्रेयसीला त्रास व्हायचा. यावरुन सुनीता व लक्ष्य यांच्यात भांडण व्हायचे.

बुधवारी रात्री लक्ष्य, सुनीता या दोघांनीही अमलीपदार्थांचे सेवन केले होते. दोघेही नशेत असताना पुन्हा वाद झाला. वादादरम्यान लक्ष्यने सुनीता यांना धक्का दिला. यानंतर त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला लक्ष्यने सुनीता यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, त्याचे संशयास्पद वागणे आणि दिलेल्या माहितीमधील विसंगती यामुळे पोलिसांना लक्ष्यवर संशय आला. शेवटी चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी लक्ष्यला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.